No Foodborne Transmission of COVID-19: कोविड 19 चा प्रादुर्भाव असलेल्या देशातून आयात केलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी सुरक्षित: FSSAI चा अहवाल
मासे (Photo Credits : Pixabay)

मागील 6 महिन्यांपासून कोरोना व्हायरस सोबत झुंजणार्‍या भारत देशामध्ये आता हळूहळू आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. अशामध्ये परदेशातून आयात होणार्‍या अन्नपदार्थांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा शिरकाव करू शकतो का? अशी भीती अनेकांच्या मनात होती. दरम्यान यावर लोकसभेत शुक्रवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार, अद्याप FSSAI ला अन्नपदार्थांमधून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो किंवा झाला असल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. यावेळेस त्यांनी माहिती देताना कोविड 19 (COVID 19) चा प्रादुर्भाव असलेल्या देशातून आयात केलेले पदार्थ मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

चीन मध्ये कोविड 19 चा आऊटब्रेक झाल्यानंतर तेथून भारतामध्ये आयात होणारे पदार्थ सुरक्षित आहेत का? याची तपासणी करण्यासाठी FSSAI ने एक समिती बनवली होती. त्यांच्या अहवालानुसार, अद्याप कोरोना व्हायरसचा अन्नाच्या माध्यमातून प्रसार झालेली घटना समोर आलेली नाही. त्याचे पुरावे नाहीत. आरोग्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री अश्विनी चौबे (Ashwini Choubey) यांनी याबद्दल माहिती लेखी स्वरूपात सादर केली आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने देखील यापूर्वीच कोरोना व्हायरसची लागण ही मानवी शरीरातून संपर्कात आलेल्या ड्रोपलेटच्या माध्यमातून होण्याची शक्यता अधिक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अन्नपदार्थाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो याबाबत अनेक समज-गैरसमज नागरिकांच्या मनात आहेत. त्यांच्याबददल FSSAI सातत्याने भूमिका घेत गैर समजुती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान कोविडशी सामना करताना देशातील अन्न पुरवठ्याची साखळी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी 12 मे ला फूड अथॉरिटी कडून देशातील फुड इंडस्ट्री मधील लोकांशी बोलून कर्मचार्‍यांना कमीत कमी धोका कसा राहील याची खबरदारी घेण्यासाठी नियमावली जारी झाली होती.