Telangana CM Chandrasekhar Rao (Photo Credits: PTI/File)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी आज दुपारी पूरग्रस्त भद्राचलम शहराला भेट दिली. यानंतर त्यांनी मदत छावण्यांमध्ये जाऊन विस्थापितांची भेट घेतली. यासोबतच छावण्यांमध्ये राहणाऱ्या सर्व कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली. त्याचवेळी, त्यांनी पूरग्रस्त मुलुगु, भूपालपल्ली, कोठागुडेम, महबूबाबाद आणि निर्मल जिल्हा प्रशासनांना प्रत्येकी 1 कोटी रुपये तातडीने जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक विचित्र टिप्पणी केली. ते म्हणाले की, ‘राज्यातील ढगफुटी हा परकीय कारस्थानाचा परिणाम आहे.’

देशातील ढगफुटीच्या घटनेमागे इतर देशांचा हात असू शकतो, असे केसीआर यांचे मत आहे. मदत शिबिरात पूरग्रस्तांना संबोधित करताना केसीआर म्हणाले की, ‘पूर्वी अशा गोष्टी फक्त लेहमध्येच व्हायच्या पण आता आंध्र प्रदेशातही अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. यामागे काहीतरी परदेशी षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. हे कितपत खरे आहे हे मला माहीत नाही. काही देशांमुळे आपल्या देशात ढगफुटी होत असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये असे घडले होते.’

गेल्या काही दिवसांत तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तेलंगणातील काही जिल्ह्यांमध्ये नदीकाठची सखल गावे आणि शहरे जलमय झाली आहेत. 29 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाऊस पूर्णपणे थांबू पर्यंत मदत शिबिरे सुरू ठेवण्याचे निर्देश केसीआर यांनी अधिकाऱ्यांना दिले. जवळपास आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तेलंगणातील अनेक भाग जलमय झाले आहेत. भद्राचलम मंदिरातील पाण्याची पातळी 70 फुटांवर पोहोचली होती.

पावसामुळे गोदावरी दृष्यातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून भद्राचलम येथील तिसऱ्या धोक्याची पातळी गाठली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री हरीश राव यांनीही पुरामुळे साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आढावा बैठक घेतली आहे. (हेही वाचा: देशाच्या लोकसंख्याएवढे वृक्ष लागवड करणार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचा नवा निर्धार)

तेलंगणा सरकारने गुरुवारी सखल भागात राहणाऱ्या लोकांची ओळख पटवून त्यांना विशेष शिबिरांमध्ये पाठवण्याचे निर्देश दिले. मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी भद्राद्री कोथागुडेम, भूपालपल्ली, पेड्डापल्ली आणि मुलुगु जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (एसपी) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरसंचार परिषद घेतली आणि संबंधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा (गुरुवारी) आढावा घेतला.