Hyderabad Floods in Pics (Photo Credits: @Rithvik_yadav/ Twitter)

गेल्या दोन दिवसांपासून तेलंगाना (Telangana) राज्यामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हैद्राबाद (Hyderabad) सह आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता माहिली मिळत आहे तेलंगाना राज्यात पावसामुळे किमान 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने गुरुवारी ही माहिती दिली. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका भागात जवळजवळ 31 जणांचा मृत्यू झाला. दोन दिवस कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर झालेल्या पुराच्या विनाशामध्ये 6,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एएनआय ट्वीट -

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतीच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली आणि तातडीने मदत व पुनर्वसन कामांसाठी 1,350 कोटी रुपयांची मदत जाहीर करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. गुरुवारी पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर बचावकार्य मार्गावर आले. बृहत्तर हैद्राबाद महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार अजूनही बहुतांश भागात पाणी तसेच साचले आहे. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार म्हणाले, जलयुक्त भागातील पाणी उपसण्याचे काम बचाव पथक करीत आहे. तसेच रहदारी रुळावर आणणे, पूरग्रस्त रस्ते, घरे, वाहून गेलेली वाहने यांबाबत मदत सुरु आहे. (हेही वाचा: Hyderabad Rains: हैद्राबादमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; 11 जणांचा मृत्यू, शहरात पूरस्थिती, पहा काळजाचा ठोका चुकवणारे Photos and Videos)

सध्या 61 मदत केंद्रे चालविली जात आहेत आणि आवश्यकतेनुसार अधिक केंद्रे सुरू केली जात आहेत. कुमार म्हणाले की, दीड लाख खाण्याच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले असून, अन्नपूर्णा अनुदान भोजनाचा वापर ज्या भागात अद्यापही पाणी आहे तिथे केला जात आहे. मदत शिबिर आणखी काही दिवस सुरू राहणार आहेत. या पावसानंतर आता अधिकाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांची चिंता लागली आहे. दोन दिवसांत संपूर्ण हैद्राबाद शहर अस्ताव्यस झाले आहे, अशात अनेकांनी जीर्ण इमारती आणि बांधकाम साइट्सवर आश्रय घेतला आहे, अशा ठिकाणी हा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.