Tamil Nadu Assembly Elections 2021: प्रचारावेळी AIADMK उमेदवार Thanga Kathiravan यांनी धुतले जनतेचे कपडे; दिले सत्तेत आल्यावर वॉशिंग मशीन देण्याचे आश्वासन (Watch Video)
Thanga Kathiravan (Photo Credit : ANI)

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) नागापट्टिनम विधानसभा मतदारसंघातील एआयएडीएमकेचे (AIADMK) उमेदवार टी. कठीरावन (Thanga Kathiravan) यांनी, सोमवारी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वांसमोर कपडे धुतले. निवडणूक प्रचारादरम्यान, त्यांनी एका महिलेला आपल्या कुटुंबाचे कपडे धुताना पाहिले. कठीरावन यांनी त्या महिलेला काही कपडे धुण्यासाठी परवानगी मागितली आणि मग स्वतः कपडे धुण्यास सुरुवात केली. या महिलेने सुरुवातीला नकार दिला, परंतु कठीरावन यांनी वारंवार विनंती केल्याने संकोचून त्या महिलेने एआयएडीएमकेच्या उमेदवाराला कपडे धुण्यास दिले. कठीरावन यांनी फक्त कपडेच धुतले नाहीत तर तिथे जवळच असलेली भांडीही घासली.

अण्णाद्रमुकच्या उमेदवाराचे हे कृत्य पाहून आजूबाजूचे लोकही चकित झाले. जेव्हा लोकांनी कठीरावन यांना असे करण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘जर त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर ते महिलांना मोफत वॉशिंग मशीन देतील जेणेकरून कपडे धुणार्‍या स्त्रियांचे हात दुखणार नाहीत.’ पुढे ते म्हणाले, 'महिलांची मेहनत समजून घेण्यासाठी आणि दाखवण्यासाठी मी हे केले. आमचा पक्ष महिलांच्या कठोर परिश्रमांबद्दल चिंतित आहे. म्हणून मी महिलांना मशीन देण्याचे आश्वासन दिले.’ (हेही वाचा: Rahul Gandhi Teaches Aikido: राहुल गांधी यांनी Kerala Assembly Elections 2021 प्रचारादरम्यान विद्यार्थ्यांना शिकवले अकिडो)

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून आणि अगदी पक्षांकडूनही मतदारांना भेटवस्तू देण्याची राजकीय प्रथा राहिली आहे. सध्या सत्तेत असलेल्या एआयएडीएमकेने आपल्या जाहीरनाम्यात बरीच आश्वासने दिली आहेत. एआयएडीएमकेच्या वतीने जाहीरनामा वाचताना पक्षाचे नेते सी पोन्नयन म्हणाले होते की, राज्यात त्यांचे सरकार बनल्यास दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला एलपीजीचे 6 सिलिंडर विनाशुल्क दिले जातील. यासह, प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीस राज्य सरकारकडून सरकारी नोकरी दिली जाईल. ते पुढे म्हणाले, 'आम्ही श्रीलंकेच्या तामिळ शरणार्थींसाठी दुहेरी नागरिकत्व आणि निवासी परवान्यांसाठी केंद्र सरकारकडे विनंती करू. एआयएडीएमके केंद्र सरकारला नागरिकत्व कायदा (CAA) मागे घेण्यास सांगत राहील.'