जगातील सात आश्चर्यांमध्ये गणली जाणारी भारतीय वास्तू म्हणजेच ताजमहाल (Taj Mahal) मध्ये महिलांसाठी एक नवी सुविधा उपलब्ध करण्याचे ठरवले आहे.पर्यटनासाठी आपल्या लहानग्यांसोबत येणाऱ्या महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करायचे असल्यास अनेक समस्या येतात यावर उपाय म्हणून लावकारच ताजमहाल मध्ये स्तनपानासाठी (Breastfeeding Room) विशेष खोली उभारण्यात येणार आहे. या खोलीचे उदघाटन साधारणपणे जुलैच्या महिन्यात केले जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.याचबरोबर ही सुविधा देणारी ताजमहाल ही पहिली भारतीय वास्तू ठरली आहे.
एकीकडे आपल्या देशात वैचारिक प्रगतीची भाषणे दरदिवशी सोशल मीडियावर केली जात असताना स्तनपानासारखा मुद्दा हा नेहमी निषिद्ध मानला जातो, अशात एखाद्या महिलेने उघड्या जागी सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करायचे म्हटल्यास सगळ्यांच्या भुवया उंचवतात. या समस्येवर तोडगा काढत ताज महाल मध्ये हा अनोखा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे, ताजमहाल हे पर्यटंकाचे विशेष आकर्षण असल्याने असंख्य महिला पर्यटक रोज या ठिकाणाला भेट देतात, त्यांच्यासोबत अनेकदा त्यांची लहान बाळं देखील असतात त्यांना स्तनपान करताना गैरसोय होऊ नये म्हणून हा प्रकल्प सुरु करण्याचे योजले आहे, यामुळे इथल्या पर्यटनाला देखील चालना मिळेल असे सांगण्यात येत आहे.
भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी वसंत कुमार सरवणकर यांनी या विषयी अधिक माहिती देताना म्हंटले की, भारतात स्तनपानासारखा मुद्दा अजूनही बोलण्यातून वगळला जातो हे दुःखद आहे. या बाबतची संकुचित विचारसरणी हटविण्यासाठी हे मोठे पाऊल ताजमहालामध्ये घेण्यात येणार आहे, ताजमहाल ही एक ऐतिहासिक वस्तू असल्याने या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी देखील इथूनच व्हावी असा मानस वसंत यांनी बोलून दाखवला.
ताजमहाल पाठोपाठ अन्य पर्यटन स्थळी देखील अशा प्रकारच्या सुविधा सुरु करण्याचा भारतीय पुरातत्व विभागाचा विचार सरवणकर यांनी मांडला यानुसार काहीच महिन्यात आग्रा किल्ला आई फतेहपूर सिखरी याठिकाणी देखील जागेची तपासणी सुरु आहे.