पवनउर्जा क्षेत्रात काम करणारी Suzlon Energy कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
Wind Energy | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

डोक्यावर असलेला कर्जाचा बोजा आणि औद्योगिक क्षेत्रात असलेली मंदी सदृश्य स्थिती आदी कारणांमुळे आणखी एक भारतीय कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे वृत्त आहे. पवन टरबाइन निर्माता सुजलान एनर्जी (Suzlon Energy) असे या कंपनीचे नाव आहे. बँकींग क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या कंपनीवर तब्बल 7,751 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जामुळे ही कंपनी सध्या बिकट अवस्थेतून मार्गक्रमण करत आहे. तसेच, हे कर्ज भागविण्यासाठी कोणती विशेष योजना सध्यातरी कंपनीच्या दृष्टीक्षेपात नाही. याच कारणामुळे या कंपनीचे दिवाळं वाजण्याची शक्यता वर्तवली आहे. या कंपनीने दिवाळे जाहीर करण्याची तयारी सुरु केल्याचेही वृत्त आहे. कंपनीने असे केले तर हे प्रकरण दिवालिया कोर्ट नेशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (National Company Law Tribunal) कडे जाण्याची शक्यता आहे.

सुजलॉन कंपनी (Suzlon Energy) ने मार्च 2019 पर्यंत सुमारे 7,751 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. याशिवाय कंपनीने आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी जून 2019 पर्यंत 4,000 कोटी रुपयांचे कार्यरत भांडवल कर्ज (Working Capital Loan) घेतले आहे. कंपनीने 4978 कोटी रुपये महसूलावर 1,537 कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. सुजलॉन एनर्जी कंपनीला या आर्थिक वर्षात 1,928 कोटी रुपये, आर्थिक वर्ष 2021 मध्ये 835 कोटी रुपये, आर्थिक वर्ष 2022 मध्ये 926 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये 4,448 कोटी रुपयांचे देय द्यायचे आहे. हे देणे यापुढेही असेच राहणार आहे.

कंपनीसमोर खरा प्रश्न तेव्हा निर्माण झाला जेव्हा गेल्या काही दिवासांपासून बॉंडशी संबंधीत 17.2 कोटी डॉलर थकीत बॉंडची मूळ रक्कम जमा करण्यात कंपनी अयशस्वी राहीली. सुजलॉन एनर्जीने आपल्या एका प्रतिक्रियेत म्हटले होते की, 'बाँडची थकीत मूळ रक्कम जमा केली नाही. ही रक्कम 172,000,000 डॉलर (करीब 1,180 कोटी रुपये) इतकी आहे. बाँड नियम अटींनुसार हे देणे 16 जुलै 2019 पर्यंत अदा केले जामे अपेक्षीत होते'. दरम्यान, कंपनीने असेही म्हटले आहे की, आपल्या कर्जावर पर्याय काढण्यासाठी कंपणी कार्यरत आहे. तसेच, बाँडशी संबंधीत इतर थकबाकीवर विविध संबंधितांशी चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, Eveready आता वॉरन बफे यांच्या Duracell कंपनीच्या मालकीची? 1700 कोटी रुपयांना व्यवहार झाल्याची चर्चा)

दरम्यान, कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सुजलॉन कंपनीला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काही कारणाने पुढे या दोन्ही कंपन्या आपल्या इच्छेपासून मागे हटल्या. बोलले जाते की, सुरुवातीच्या काळात कॅनडाची कंपनी ब्रुकफील्ड (Brookfield) सुजलॉनमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक होती. कंपनीने तसा प्रस्तावही दिला होता मात्र सुजलॉनने काही अटी ठेवल्याने हा व्यवहार थांबला. दरम्यान, सुजलॉन या पुढे कशी मार्ग काढते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.