अंधश्रद्धेचा कळस: कुंडली दोष नाहीसे होण्यासाठी लावले कुत्रा-कुत्रीचे लग्न, 500 लोक, निमंत्रण पत्रिका, DJ, मेजवानी, वरात असा होता थाट
कुत्रा-कुत्रीचे लग्न (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात प्रयागराजमध्ये (Prayagraj) एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. शुक्रवारी संध्याकाळी इथल्या ग्रामस्थांनी चक्क कुत्रा आणि कुत्री यांचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले. आता सेहरा परिधान केलेला कुत्रा आणि पाय अलत्याने (कुंकू) सजवलेली कुत्री हे दृश्य संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनले आहे. ही घटना कोरांवच्या महुंली खेड्यातील आहे. जिथे मोठ्या संख्येने पाहुण्यांना कोणत्याही सामान्य लग्नाप्रमाणे कुत्रा आणि कुत्रीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती. डीजेच्या तालावर नाचत, सनई, बाजासह सुमारे 500 लोकांना घेऊन वऱ्हाड निघाले होते.

या सर्वांचे जोरदार स्वागत केले गेले. त्यानंतर सर्व रीतीरिवाजानुसार हे लग्न पार पडले. प्रत्येकाने या अनोख्या लग्नाचा भरपूर आनंद लुटला. त्यानंतर या लग्नाची मेजवानीही पार पडली. या अनोख्या लग्नात सर्व परंपरा मानवी लग्नाप्रमाणे पार पडल्या. कुत्रा तयार झाला होता. कुत्रीलाही सजवले गेले, मेहंदी काढली. ढोलक वाजवून गावातल्या महिलांनी पारंपरिक लग्नाची गाणीही गायली. शेवटी सर्व विधी झाल्यावर जेवण करून कुत्रीची पाठवणी करण्यात आली. (हेही वाचा: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार; गुप्तधन मिळावे म्हणून सुशिक्षित कुटुंबाने दोन महिने सुनेला ठेवले उपाशी)

याबाबत बोलताना कुत्र्याचे मालक राजेंद्र प्रसाद पाल म्हणाले की, शेजारी राहणारे कमलेश यांची कुत्री आमच्या राजपाल (कुत्रा) च्या प्रेमात पडली. दोघांमधील जवळीक पाहून आम्ही त्यांचे लग्न केले. असे म्हणतात की, कुत्रा-कुत्री यांचे लग्न कुंडली मधील दोष दूर करण्यासाठी केले जाते. यामुळे जन्मकुंडलीतील दोषांमुळे प्रभावित झालेल्या जोडप्याच्या जीवनात कोणतीही अडचण उद्भवत नाही. त्याच बरोबर, ग्रामस्थांचा असा विश्वास आहे की असे केल्याने गावावर ग्रह-दोषांचे दुष्परिणाम होत नाहीत. कारान काहीही असो अशा कल्पना लोकांना सुचतात कशा याचे जास्त आश्चर्य आहे.