चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात अंधश्रद्धेचा (Superstition) एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशिक्षित कुटुंबाने गुप्तधन मिळावे म्हणून आपल्या कुटुंबातील महिलेला चक्क 50 दिवस, म्हणजेच जवळजवळ 2 महिने उपाशी ठेवले आहे. चिमूर तालुक्यातील कारेकर कुटुंबाने या महिलेची फक्त उपासमारच केली नाही तर तिला मारहाण देखील केली आहे. आश्चर्य म्हणजे लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून हा प्रकार सुरु झाला होता. समीर गुणवंत कारेकर असे या मुलीच्या नवऱ्याचे नाव असून, ऑगस्ट 2018 मध्ये हा विवाह झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहाच्या पहिल्याच रात्री वधूला रात्री उठवून घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता आणि दर्गा धुण्यास सांगितले गेले. त्यानंतर जिवंत कासवाला अंघोळ घालून त्याची पूजा करण्यास भाग पाडले. दरम्यान समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला आणि त्याने आपल्या बायकोला बेदम मारहाण, चटके देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अंगणात असलेले गुप्तधन वर येईल या आशेने या मुलीला उपाशी ठेवण्यास सुरुवात झाली. (हेही वाचा: परिवारासमवेत नग्न होऊन शिक्षक देत होता तीन वर्षाच्या मुलीचा बळी, वाचा नेमकं घडलं काय?)
या काळात मुलीचा माहेरच्या लोकांशी काहीही संपर्क होऊ शकला नाही. हा छळ चालू असताना हा समीरचा तिसरा विवाह असल्याची माहिती मुलीला समजली. काही काळानंतर या छळाची माहिती मुलीच्या माहेरच्या लोकांना मिळाली. त्यांनी ताबडतोब तिला माहेरी आणले. या संपूर्ण प्रकरणाविषयी नवविवाहितेच्या वडिलांनी पोलीस आणि वनविभागाला माहिती दिली. दरम्यान समीर चौथा विवाह करणार असल्याची माहिती मिळाल्याने, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने हे प्रकरण माध्यमांसमोर आणले. अखेर सासू सासऱ्यासह नवरा समीर कारेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.