कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचा सामना करण्यासाठी, भारत आपली लसीकरण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. देशात आतापर्यंत एकूण सहा लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. लसीकरणाबाबत भारताची क्षमता पुढील महिन्यापासून म्हणजे डिसेंबरपासून आणखी मजबूत होणार आहे. अँटी-कोविड-19 लस स्पुतनिक लाइट (Sputnik Light) भारतात डिसेंबरपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. ही लस सिंगल डोस लस आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल दिमित्रीव यांनी ही माहिती दिली आहे. रशियाचा दावा आहे की स्पुतनिक लाइट पहिल्या तीन महिन्यांत कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरूद्ध 70 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.
ऑक्टोबर महिन्यात, सरकारने देशांतर्गत उत्पादित रशियन सिंगल-डोस कोविड-19 लस स्पुतनिक लाइटच्या निर्यातीला परवानगी दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारतीय औषध कंपनी हेटेरो बायोफार्मा लिमिटेडला रशियाला स्पुतनिक लाइटचे 4 दशलक्ष डोस निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली होती. सध्या ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेली नाही. रशियन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्पुतनिक लाइटवर केलेले विश्लेषण 28 हजार सहभागींकडून मिळालेल्या डेटावर आधारित होते.
Sputnik light COVID vaccine to be launched in India by December: Kirill Dmitriev, CEO, Russian Direct Investment Fund pic.twitter.com/Ybjmsi6yfS
— ANI (@ANI) November 24, 2021
यापूर्वी, किरिल दिमित्रीव यांनी सांगितले होते की, भारतात स्पुतनिकचे उत्पादन यावर्षी सप्टेंबरपासून सुरू केले जाईल. भारतात दरवर्षी 300 दशलक्ष स्पुतनिक डोस तयार करण्याची योजना आखली जात आहे. या वर्षी डिसेंबरपासून स्पुतनिक V चे उत्पादन सुरू झाल्याने भारताला आणखी एक लस मोठ्या प्रमाणात मिळण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: कोवॅक्सिनचे दोन्ही डोस लक्षणात्मक कोरोना रूग्णांवर फक्त 50% पर्यंत प्रभावी; AIIMS च्या अभ्यासात दावा)
जुलैमध्ये, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या विषय तज्ञ समितीने स्पुतनिक लाइट लसीच्या आपत्कालीन वापरासाठीची शिफारस नाकारली होती. या लसीची भारतीय लोकांवर चाचणी झालेली नाही, त्यामुळे तिला परवानगी देता येणार नाही, असे समितीने म्हटले होते. यावर कंपनीने म्हटले होते की, स्पुतनिक लाइटमध्ये तेच घटक समाविष्ट आहेत जे स्पुतनिक-व्ही मध्ये होते. म्हणजेच दोन्हीचे घटक समान आहेत. अनेक अभ्यासांमध्ये ही लस अत्यंत प्रभावी असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत आहेत. त्याची किंमत सुमारे 750 रुपये असण्याची शक्यता आहे.