लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची मोठी कारवाई, एआयडीएमकेचे 26 खासदार निलंबित
Lok Sabha Sumitra Mahajan | (Archived and representative images)

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन (Lok Sabha Sumitra Mahajan) यांनी ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK ) पक्षाच्या तब्बल 26 खासदरांवर निलंबनाची (Suspend) कारवाई केली आहे. हे सर्व खासदार गेली दोन दिवस लोकसभा सभागृहात अध्यक्षांच्या आसनासमोर असलेल्या मोकळ्या जागेत (वेल) येऊन कामकाजात अडथळा आणत होते. या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी अनेकदा सूचना देऊनही या खासदारांचे वर्तन कायम होते.

प्राप्त माहितीनुसार या खासदारांना संसदीय अधिवेशन काळात एकूण पाच दिवसांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. निलंबीत करण्यात आलेल्या खासदारांमध्ये डॉक्टर के कामराज, के परस्यूमन, डॉक्टर जयकुमार जयवर्धन यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ खासदारांचा समावेश आहे. लोकसभेत तीन तलाख विधेयकावर चर्चा सुरु असतानाही AIADMK खासदारांनी जोरदार गोंधळ घातला होता. (हेही वाचा, राफेल घोटाळा टेप: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब)

दरम्यान, या खासदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले. दरम्यान, कामकाज तहकूब करण्यापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी राफेल मुद्द्यावरुन सभागृहात आक्रमक झालेल्या काँग्रेस खासदारांनाही खडे बोल सुनावले. सभागृहातील सदस्यांचे हे वर्तन सभागृहाच्या संकेताला धरुन नाही असे सांगत अध्यक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली.