देवासमध्ये (Dewas) एका महिलेने प्रियकराचा त्रास कमी करण्यासाठी त्याच्या दुसऱ्या पत्नीचा काटा काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेने आपल्या एका मैत्रिणीच्या मदतीने प्रियकराच्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली. ब्लाउज शिवण्याच्या बहाण्याने दोघीही प्रियकराच्या पत्नीला भेटल्या व तिथे तिचा गळा आवळून जीव घेतला. यानंतर आरोपी प्रेयसीने प्रियकराच्या घरी जाऊन या प्रकाराची माहिती दिली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तरुणाने पत्नीचा मृतदेह घेऊन हॉस्पिटल गाठले आणि पत्नी अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगितले. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यानंतर श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची बाब समोर आली.
यानंतर पोलिसांनी तीनही जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे, आरोपी प्रियकराचे दोनदा लग्न झाले होते आणि त्याची गर्लफ्रेंड म्हणजेच आरोपी महिला देखील विवाहित आहे व ती एका 7 वर्षांच्या मुलीची आई आहे. बबलू उर्फ नरसिंगदास परमार्थी असे या प्रियकराचे नाव आहे. तो एक मेडिकल स्टोअर चालवतो. बबलूचे 14 वर्षांपूर्वी नीलम नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. त्यांना तीन मुलेही आहेत. यानंतरही तीन महिन्यांपूर्वी मे 2022 मध्ये बबलूने एका मंदिरात राणी नावाच्या तरुणीशी दुसरे लग्न केले.
बबलूने राणीला खारी बाओरी येथे भाड्याची खोली मिळवून दिली व तिचा खर्चही तोच करू लागला. हा प्रकार बबलूच्या पत्नीसह कुटुंबीयांना समजल्यावर घरात वाद सुरु झाले. सततच्या भांडणामुळे बबलू नेहमी चिंताग्रस्त राहत होता. दोन पत्नींसोबतच बबलूचे रितू गौर नावाच्या महिलेसोबत 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रितू दागिन्यांच्या दुकानात काम करते. एक दिवस बबलूला अस्वस्थ पाहून रितूने कारण विचारले. तेव्हा राणीसोबत लग्न करण्याचा निर्णय चुकल्याचे त्याने सांगितले. यावर राणीचा काटा काढायची योजना दोघांनी आखली.
त्यानंतर साधारण 1 महिन्याने रितू तिची बालपणीची मैत्रिण प्रियंकासोबत ब्लाउज शिवण्याच्या बहाण्याने राणीच्या घरी पोहोचली. घरात राणी एकटीच आहे हे पाहून, त्यांनी दुपट्ट्याने तिचा गळा दाबला आणि नंतर उशीने तोंड तोबले. त्यानंतर रितूने थेट बबलूकडे जाऊन हत्येची माहिती दिली. नंतर बबलू राणीच्या घरी पोहोचला व मृतदेह घेऊन त्याने रुग्णालय गाठले. तिथे शवविच्छेदनानंतर श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. (हेही वाचा: Bengaluru मध्ये ड्रग्सच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यावर केली लघूशंका; कर्नाटक पोलिसांकडून FIR दाखल)
त्यानंतर कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांना बबलूवर आधीच संशय होता, त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने सगळा प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी प्रियंका आणि रितूला अटक केली. खुनात वापरलेली उशी आणि दुपट्टाही जप्त करण्यात आला आहे.