
कोरोना व्हायरस लॉक डाऊनचा (Coronavirus Lockdown) सर्वात जास्त फटका एअरलाईन कंपन्यांना (Airline Companies) बसला आहे. आर्थिक संकटाशी झुंजणार्या या कंपन्या खर्च कमी करण्यासाठी नव-नवीन मार्ग शोधत आहेत. आता एअर इंडियाने (Air India) कर्मचार्यांची संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार कर्मचारी वेतनाशिवाय (Without Pay) मोठ्या रजेवर जाऊ शकतात, या गोष्टीला लीव्ह विदाऊट पे (LWP) असे म्हणतात. ही सुट्टी 6 महिने ते पाच वर्षेपर्यंत असू शकते. म्हणजेच एअर इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षांपर्यंत पगार न देता सुट्टीवर पाठवू शकते.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव बंसल यांना अधिकार देण्यात आला आहे की, ते काही कर्मचार्यांना पगार न देता 6 महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंत रजेवर पाठवू शकतात. कर्मचार्यांची कार्यक्षमता, कामगिरीची गुणवत्ता, कर्मचार्यांचे आरोग्य इत्यादींच्या आधारे कर्मचाऱ्यांची निवड केली जाईल. एअर इंडियाच्या या योजनेस संचालक मंडळाच्या 102 व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आदेशानुसार मुख्यालय व प्रादेशिक प्रमुख यांना या योजनेनुसार कर्मचार्यांची नावे मुख्यालयात पाठविण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: जिओसोबत भागीदारी केल्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत इंटरनेट पोहोचता येईल, याचा मला अभिमान वाटतोय- सुंदर पिचाई
आतापर्यंत ‘गो एअर’ या कंपनीने पगार न देता सर्वात जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. दुसरीकडे एअर इंडियाने सांगितले आहे की, 20 जुलैपासून त्यांची सर्व कार्यालये सुरू होणार आहेत. जे कर्मचारी कार्यालयांमध्ये येणार नाहीत त्यांची अनुपस्थित म्हणून नोंद केली जाईल. यामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या कर्मचार्यांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना पाहता आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा बंदी 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली होती.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे 23 मार्चपासून भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. यासह देशांतर्गत विमान सेवाही बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.