SCO Film Festival (Photo Credit : ANI)

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे मुंबईत 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चित्रपट महोत्सवाचे (SCO Film Festival) आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) मार्फत हा महोत्सव आयोजित केला गेला आहे. आज संध्याकाळी लोकप्रिय चित्रपट व्यक्तिमत्वे तसेच एससीओ देशांच्या उपस्थितीत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले.

सिनेमॅटिक भागीदारी निर्माण करणे, एससीओ मधील विविध देशांच्या संस्कृतींमधील पूल म्हणून काम करणे आणि सामूहिक सिनेमा अनुभवाद्वारे एससीओ सदस्यांच्या चित्रपट समुदायांमध्ये सुसंवाद निर्माण करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

एससीओ चित्रपट महोत्सवात एससीओ देशांमधील एकूण 57 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ज्यामध्ये स्पर्धा विभागात 14 फीचर फिल्म्स आणि 43 चित्रपट बिगरस्पर्धा विभागात दाखवले जाणार आहेत. यासाठी निखिल महाजन दिग्दर्शित मराठी चित्रपट गोदावरी आणि पान नलिन दिग्दर्शित गुजराती चित्रपट 'द लास्ट फिल्म शो' यांना भारतातून नामांकन मिळाले आहे. शूजित सरकारचा सरदार उधम, एसएस राजामौली यांचा आरआरआर देखील यामध्ये दाखवला जाणार आहे.

मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले की, मुंबईत सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्व सदस्य देशांना औपचारिकपणे आमंत्रित करण्यात आले होते आणि या कार्यक्रमात सहभागी होणे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. एससीओ सदस्य राष्ट्र म्हणून पाकिस्तानलाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते का, या प्रश्नाला मंत्री उत्तर देत होते. चित्रपट महोत्सवात विविध एससीओ सदस्य देशांचे 57 चित्रपट दाखवले जाणार आहेत, परंतु त्यामध्ये एकही पाकिस्तानचा चित्रपट नाही.

या महोत्सवात 5 चीनी चित्रपट दाखवले जाणार आहेत. एससीओ फिल्म फेस्टिव्हल आणि संबंधित सत्रांचे चित्रपट मुंबईतील दोन ठिकाणी प्रदर्शित केले जातील. यामध्ये पेडर रोड येथील फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्समधील चार सभागृहे आणि नेहरू तारांगण बिल्डिंग, वरळी येथील एनएफडीसीच्या एका थिएटरचा समवेश आहे. (हेही वाचा: भाजप मंत्री Anurag Thakur यांची चित्रपटांच्या 'बॉयकॉट' ट्रेंडवर जोरदार टीका, जाणून घ्या काय म्हणाले)

दरम्यान, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून 2023 हे वर्ष भारतासाठी खूप खास आहे. भारत जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक गट G20 चे नेतृत्व करण्याबरोबरच, भारत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचेही अध्यक्षपद भूषवत आहे. एससीओ ही एक बहुपक्षीय संस्था आहे, ज्याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. याचे मुख्यालय बीजिंग, चीन येथे आहे. या संस्थेमध्ये चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान असे आठ देश सामील आहेत. बेलारूस, इराण आणि मंगोलिया असे तीन निरीक्षण देश आहेत.