Boycott Bollywood Trend: भाजप मंत्री Anurag Thakur यांची चित्रपटांच्या 'बॉयकॉट' ट्रेंडवर जोरदार टीका, जाणून घ्या काय म्हणाले
Anurag Thakur (Photo Credit - Twitter)

बॉलीवूड इंडस्ट्री आणि बॉलिवूड चित्रपटांच्या विरोधात अनेक दिवस बॉयकॉटचा (Boycott) जबरदस्त ट्रेंड सुरू आहे. या बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांवर झाला आहे. या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे अनेक मोठ्या चित्रपटांना फ्लॉपचा सामना करावा लागला. आता शाहरुख खानच्या बहुचर्चित पठान चित्रपटावरही बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र 2 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पठानने बहिष्काराचा हा ट्रेंड मोडीत काढला आहे. पठानने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

सर्वत्र शाहरुख खान आणि पठान चित्रपटाचे कौतुक सुरु आहे. अशात आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचे एक महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. ठाकूर यांनी चित्रपटांच्या बहिष्कार संदर्भात आपले मत मांडले आहे. चित्रपट बॉयकॉट होऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. बहिष्कारच्या ट्रेंडमुळे चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे ठाकूर म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने अनुराग ठाकूर यांचे वक्तव्य ट्विटद्वारे सर्वांसोबत शेअर केले आहे.

अनुराग ठाकूर म्हणाले आहेत की, ‘आमचे चित्रपट आज जगात स्वत:चे नाव कमावत आहेत. परंतु या बहिष्कार प्रकाराचा देशातील वातावरणावर परिणाम होतो. हे वातावरण बिघडवण्यासाठी कधी कधी पूर्ण माहिती नसतानाही लोक कमेंट करतात, त्यामुळे नुकसानही होते, असे होऊ नये.’ याशिवाय अनुराग ठाकूर असेही सांगतात की, भारत सरकारने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन बनवले आहे. तिथून पास झाल्यानंतरच कोणताही चित्रपट चित्रपटगृहात जातो. ही संस्था चित्रपटांच्या सर्व पैलूंवर लक्ष ठेवते. तिथून परवानगी मिळाल्याच चित्रपट पडद्यावर दाखवला जातो.’ (हेही वाचा: शाहरुख खानच्या पठानने रचला नवा इतिहास; ठरला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 100 कोटी पार करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट)

दरम्यान, याआधी आमिर खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे फ्लॉप झाले होते. लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधनना बॉयकॉट ट्रेंडमुळे मोठे नुकसान झाले होते. अशा स्थितीत पठानबाबतही मोठा विरोध दिसून आला. गेले अनेक दिवस या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. मात्र 4 वर्षांनंतर शाहरुख खानच्या धमाकेदार कमबॅकने सर्वांचीच बोलती बंद केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.