
देशाला महागाईच्या (Inflation) तडाख्यातून दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये किरकोळ महागाईत (Retail Inflation) घट नोंदवण्यात आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.70 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 18 महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दरात घट झाली आहे. यापूर्वी मार्च 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 5.66 टक्के होता.
सलग दुसऱ्या महिन्यात, किरकोळ महागाईचे आकडे रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेत (2% आणि 6% दरम्यान) आहेत. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर इतक्या नीचांकी पातळीवर होता. त्यावेळी सीपीआय आधारित किरकोळ महागाई 4.48 टक्के होती. आरबीआयने 2023-24 या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर एप्रिलमध्ये 3.84 टक्के होता, जो मार्चमध्ये 4.79 टक्के होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 8.31 टक्के होता. किरकोळ महागाई डिसेंबर 2022 मध्ये 5.7 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये 6.4 टक्क्यांवर पोहोचली. त्या काळात देशात तृणधान्ये, दूध आणि फळांच्या किमतीत वाढ झाली होती. (हेही वाचा: Kisan Vikas Patra (KVP) 2023: किसान विकास पत्र योजनेबद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या व्याज दर, सेवा आणि लाभ)
मार्च महिन्यातील औद्योगिक उत्पादनाचे आकडेही आले आहेत. मार्च 2023 मध्ये देशातील औद्योगिक उत्पादन 1.1 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तो 2.2 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मार्च 2023 मध्ये 1.1 टक्क्यांनी वाढला आहे. या काळात उत्पादन क्षेत्राचे उत्पादन केवळ 0.5 टक्क्यांनी वाढले. मार्चमध्ये, आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या महिन्यात, देशाच्या खाण क्षेत्राच्या उत्पादनात 6.8 टक्क्यांनी वाढ झाली, तर विजेच्या उत्पादनात 1.6 टक्क्यांनी घट झाली.