लॉकडाऊनमध्ये रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे ताबडतोब परत करा; Ministry of Civil Aviation ने विमान कंपन्यांना फटकारले
विमानप्रवास (photo Credits : pexels.com )

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या सुरूवातीस देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. यावेळी कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी, रेल्वे आणि विमान सेवा बंद करण्यात आल्या. त्यावेळी, बर्‍याच लोकांनी आधीच विमानाची तिकिटे बुक केली होती, परंतु आपत्तीमुळे ते प्रवास करू शकले नाहीत. यादरम्यान एअरलाइन्सकडूनही अनेकदा विमाने रद्द केली गेली. अशा परिस्थितीत, बुक केलेल्या तिकिटांचा परतावा अजूनही लोकांना मिळाला नाही. आता नागरी उड्डयन मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) विमान कंपन्यांना फटकारले असून कंपन्यांच्या या वृत्तीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्रालयाच्या सचिवांनी बुधवारी प्रवाशांच्या क्रेडिट शेलच्या परताव्यासंदर्भात बैठक घेतली. क्रेडिट शेल ही एक क्रेडिट नोट आहे, जी रद्द केलेल्या पीएनआरच्या संदर्भात वापरली जाते. भविष्यात तिकीट बुक करण्यासाठी प्रवासी त्याचा वापर करू शकतात. याच बैठकीत सचिवांनी परतावा परत करण्याबाबत एअरलाइन्स कंपन्यांना फटकारले. लॉकडाउनपूर्वी प्रवाशांनी खरेदी केलेल्या तिकिटांचे पैसे एअरलाइन्स कंपन्यांनी परत केले नाहीत. लॉकडाऊन दरम्यान रद्द करण्यात आलेल्या घरगुती उड्डाणांच्या हवाई भाड्यांच्या परताव्यासाठी, 31 मार्च 2021 ची अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. ही अंतिम मुदत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जारी केलेल्या आदेशाद्वारे निश्चित केली होती.

गोएयर आणि इंडिगो यांनी आपले अंडरटेकिंग मंत्रालयात सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, प्रवाशांना सर्व क्रेडिट शेल परत केले गेले आहे. (हेही वाचा: 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 12.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा IMF चा अंदाज; चीनलाही टाकणार मागे)

दरम्यान, 25 मार्च ते 25 मे या लॉकडाऊन कालावधीत रद्द झालेल्या विमान तिकिटांचे पैसे एअरलाइन्सनी क्रेडिट शेलमध्ये रुपांतरीत केले होते. याचा अर्थ बुकिंगची रक्कम परत करण्याऐवजी, ती पुढच्या प्रवासासाठी प्रवाशी वापरू शकतात. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर, कोर्टाने आदेश दिले की एअरलाइन्स परतावा रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत क्रेडिट शेलमध्ये ठेवू शकतात. या तारखेपर्यंत, प्रवाशाने जर का आधीपासून भरलेल्या बुकिंगची रक्कम वापरली नाही, तर एअरलाइन्सना प्रवाशांना ती रक्कम परत करावी लागेल.