Indian Economy Growth Rate: 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 12.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा IMF चा अंदाज; चीनलाही टाकणार मागे
भारतीय अर्थव्यवस्था | प्रतीकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

2021 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर (Indian Economy Growth Rate) झपाट्याने वाढून 12.5 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केला आहे. विकास दराच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल, असेही आयएमएफचे म्हणणे आहे. मात्र, चीन ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे ज्याचा विकास दर 2020 मध्ये कोरोना साथीच्या काळातही सकारात्मक होता. आयएमएफने आपल्या ग्लोबल इकोनॉमिक आऊटलूकमध्ये म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2022 मध्ये सुमारे 6.9 टक्क्यांपर्यंत जाईल. जागतिक बँकेसमवेत होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी मॉनिटरी फंडाने हा अहवाल जाहीर केला आहे.

आयएमएफने म्हटले आहे की, 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था विक्रमी 8 टक्क्यांनी घसरली आहे. आता या वर्षी विकास दर 12.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे, जो सध्याच्या परिस्थितीत खूपच चांगला आहे. त्याच वेळी चीनचा विकास दर 2021 मध्ये 8.6 टक्के आणि 2022 मध्ये 5.6 टक्के राहील असा अनुमान आहे. गेल्या वर्षी चीनचा विकास दर 2.3 टक्के होता आणि कोविड-19 साथीच्या काळातही सकारात्मक आर्थिक वाढ साधणारा हा जगातील एकमेव मोठा देश आहे. आयएमएफच्या चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 2021 मध्ये 6 टक्के आणि 2022 मध्ये 4.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत 3.3 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. अहवालानुसार, ही ऑक्टोबर 2020 मध्ये जाहीर झालेल्या जागतिक आर्थिक परिस्थितीच्या अंदाजापेक्षा 1.1 टक्के कमी आहे. अहवालानुसार, 2021 आणि 2022 चा अंदाज ऑक्टोबर 2020 मधील जागतिक आर्थिक परिस्थितीपेक्षा अनुक्रमे 0.8 टक्के आणि 0.2 टक्के जास्त आहे. यावरून असे दिसून येते की, लसीकरणामुळे गोष्टी पुन्हा रुळावर येत आहेत.

दरम्यान, पूर्वीच्या अंदाजापेक्षा 2021 आणि 2022 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या उत्तम रिकव्हरीची आपण अपेक्षा करीत असल्याचे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. यामध्ये 2021 मध्ये सहा टक्के आणि 2022 मध्ये 4.4 टक्के वाढ होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.