रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिकाऱ्याने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) देशातील सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मागील वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्यांनी घट होईल. अशाप्रकारे, सलग दोन तिमाहीत जीडीपीच्या घसरणीसह, देश पहिल्यांदाच आर्थिक मंदीच्या (Recession) भोवऱ्यात सापडला आहे. कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे पहिल्या तिमाहीत 23.9 टक्क्यांची घट झाली होती. दुसर्या तिमाहीतील जीडीपीचे अधिकृत आकडे अजून येणे बाकी आहे. परंतु केंद्रीय बँकेच्या संशोधकांनी अंदाज वर्तवला आहे की, सप्टेंबरच्या तिमाहीत ही घट 8.6 टक्के असण्याची शक्यता आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या आरबीआयच्या मासिक बुलेटिनमध्ये जीडीपीबाबत संशोधकांचे मत प्रकाशित केले गेले. चालू आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 9.5 टक्के घट होण्याची शक्यता आरबीआयने आधीच वर्तविली आहे. रिझर्व्ह बँकेचे संशोधक पंकज कुमार यांनी तयार केलेल्या अभ्यास अहवालात असे म्हटले आहे की, 2020-21 च्या पहिल्या सहामाहीमध्ये भारत आपल्या इतिहासात प्रथमच तांत्रिकदृष्ट्या आर्थिक मंदीमध्ये पडला आहे. आता सलग दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये असेही म्हटले आहे की, जसजशा आर्थिक क्रिया सुरळीत होत आहेत, तसतसे यामध्ये सुधारणा होत आहे.
देशातील कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण पाहून पंतप्रधानांनी 24 मार्चच्या रात्री 12 वाजेपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर देशभरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसह कारखाने पूर्णपणे बंद पडले होते. यामुळे देशातील मागणी आणि पुरवठ्यावर वाईट परिणाम झाला, परिणामी मोठ्या संख्येने लोकांना नोकर्या गमवाव्या लागल्या. या परिस्थितीत, देशात पहिल्यांदाच आर्थिक मंदीचा कालावधी सुरू झाला आणि आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचे आकडे- -23.9 वर गेले.
दरम्यान, ग्लोबल रिसर्च व ब्रोकिंग हाऊस गोल्डमन सॅक्सने 2021 मध्ये भारतातील जीडीपी 10 टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. कोरोना विषाणू लस आल्यावर भारताच्या आर्थिक स्थितीमध्ये फरक पडू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.