लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) टप्पा क्रमांक एकसाठी देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात असम (Assam) राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय प्रचाळाची रणधुमाळी या मतदारसंघांमध्ये टीपेला पोहोचली आहे. त्यामुळे राजकीय नेते, पुढारी गाव, वाडी, वस्ती पिंजून काढत आहेत. अशा वेळी या राज्यातील सोनितपूर (Sonitpur) जिल्ह्यातील फुलोगुरी नेपाळी पाम गावातील दिवंगत रॉन बहादूर थापा (Late Ron Bahadur Thapa) यांचे कुटुंब देशभरात चर्चेत आले आहे. या कुटुंबाचे वैशिष्ट्य असे की, या कुटुंबात दहा, वीस नव्हे तर तब्बल 350 मतदार आहेत. या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेले कुटुंब म्हणून या कुटुंबाचा दबदबा आहे. त्यामुळे निवडणूक स्थानिक पातळीवरील असो की, राष्ट्रीय कोणताही उमेदवार, पुढारी या कुटुंबाला काहीसे वचकूनच असतात. या कुटुंबाला ते टाळू शकत नाहीत. एक प्रकारेच ते या कुटुंबाचा धकसाकाच घेतात.
कुटुंबात जवळपास 150 हून अधिक नातवंडे
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, असम राज्यातील हा जिल्हा रंगपारा विधानसभा मतदारसंघ आणि सोनितपूर संसदीय विभागाच्या कक्षेत येतो. प्राप्त माहितीनुसार, येथील एकूण सुमारे 1200 सदस्यांच्या कुटुंबात सुमारे 350 सदस्य आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रॉन बहादूर यांच्या पश्चात कुटुंबात जवळपास 150 हून अधिक नातवंडे आहेत. सोनितपूर लोकसभा मतदारसंघातील फुलोगुरी नेपाळी पाम भागात एकाच वंशातील सुमारे 300 कुटुंबे राहतात. त्यामळे एकाच वंशाचे असल्याने येथील सर्व नागरिक जवळपास एकाच कुटुंबातील असतात असे मानले जाते. नेपाळी पाम गावाचे ग्रामप्रमुख आणि दिवंगत रॉन बहादूर यांचा मुलगा तिल बहादूर थापा यांनी एएनआयला सांगितले की त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सुमारे 350 लोक मतदान करण्यास पात्र आहेत. (हेही वाचा, How to Know Polling Booth Online: लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी तुमचं मतदान केंद्र कुठं? बुथ क्रमांक कोणता ? electoralsearch.eci.gov.in वर असं पहा एका क्लिक वर!)
बहादूर थापा यांच्या वंशजांची तक्रार
तिल बहादूर थापा पुढे सांगतात की, त्यांच्या कुटुंबाची मतदानाची ताकद त्यांच्या व्यापक वंशातून निर्माण झाली आहे. ते म्हणाले, "या निवडणुकीत, नेपाळी पाममधील थापा कुटुंबातील जवळपास 350 सदस्य मतदान करण्यास पात्र आहेत. जर आपण सर्व मुलांची गणना केली, तर आमच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या 1,200 पेक्षा जास्त होईल." गावात त्यांच्या वंशाची आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी असूनही, या कुटुंबाला सरकारी कल्याणकारी योजना आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तिल बहादूर यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडून लाभ न मिळाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. तसेच, कुटुंबातील काही सदस्य उच्च शिक्षण घेत असताना, त्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला याकडेही लक्ष वेधले.
रॉन बहादूरचा दुसरा मुलगा, सरकी बहादूर थापा याने तिल बहादूर यांच्या वक्तव्याला दुजोरा देत म्हटले की, होय, आमच्या कुटुंबात सुमारे 350 पात्र मतदार आहेत. 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 7 मे रोजी तीन टप्प्यांत होणाऱ्या राज्यातील 14 लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांदरम्यान त्यांनी निवडणूक प्रक्रियेत योगदान दिल्याने थापा कुटुंबाचे लक्षणीय मतदान आसाममधील चैतन्यशील लोकशाही भावना अधोरेखित करते.