Yes Bank Crisis: येस बँकेला उतरती कळा? संस्थापक राणा कपूर यांनी 510 कोटींना विकली भागीदारी
Yes Bank (Photo Credits: Wikipedia)

आर्थिक क्षेत्रात दिवसागणिक बदलत असलेली गणिते, ऑटो क्षेत्रात आलेली मंदी याचा परिणाम बँकिंग क्षेत्रावरही होत आहे. येस बँकेचे (Yes Bank) प्रवर्तक राणा कपूर (Rana Kapoor) आणि त्यांच्या दोन ग्रुप युनिट्सनी बँकेमधील आपला 2.10 टक्के हिस्सा विकला आहे. तब्बल 510 कोटींमध्ये हा व्यवहार झाला आहे. 26-27 सप्टेंबर रोजी खुल्या बाजारातून ही विक्री झाली. मंगळवारी ही बातमी आल्यानंतर येस बँकेचे शेअर्स 22 टक्क्यांनी घसरले. वित्तीय क्षेत्रातील वाढती समस्या, ऑटो क्षेत्रातील निरंतर मंदी आणि कमकुवत मॅक्रो डेटामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाल्याने, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 36२ अंकांनी घसरला आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही 115 अंकांनी खाली येऊन, 11,400 अंकांवर पोहचला आहे. सेन्सेक्सच्या 30 समभागांची जोरदार सुरुवात झाल्यानंतर, दुपारी ती 737 अंकांपर्यंत पोहचली. राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बँकेच्या बहुतेक समभागांची विक्री केल्यानंतर, बँकेचे सह-संस्थापक, स्व. अशोक कपूरची पत्नी मधु कपूर आता बँकेची मुख्य प्रवर्तक झाली आहे. दुसरीकडे येस बँकेचे सीएफओ रजत मोंगा (Rajat Monga) यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी प्रमुख राणा कपूर यांच्या कार्यकाळात मोंगा ही बँकेतील एक महत्वाची व्यक्ती होती. (हेही वाचा: PMC बँक खातेधारकांना आता 10 हजार ऐवजी 25 हजार रुपये काढता येणार, RBI कडून निर्णय जाहीर)

एस बँकेतील शेअर्सची विक्री केल्यानंतर आता कपूर यांच्याकडे 4.72 इतके शेअर्स राहिले आहेत. बँकेचे संचालक-संस्थापक असलेल्या राणा यांना आरबीआयने त्यांना संचालक पदावरून हटवल्यावर बँकेला उतरली कळा सुरु झाली होती. एनपीएची माहिती लपवल्या प्रकरणी आरबीआयने कारवाई करत बँकेला 1 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. आता राणा यांनी राजीनामा दिल्यानंतर येस बँकेकडून कर्ज घेतलेल्या कंपन्यांची बिकट अवस्था झाली आहे.