
राम सेतूला (Ram Setu) राष्ट्रीय वारसा स्मारक (National Heritage Monument) म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर विचार सुरू असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. जनहित याचिकेवर सुनावणी करणाऱ्या मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने स्वामींना इच्छा असल्यास सरकारकडे अर्ज करण्यास सांगितले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयाला सांगितले की, सांस्कृतिक मंत्रालयानेही याबाबत बैठक घेतली होती. तत्कालीन मंत्री प्रल्हाद पटेल यांच्याशीही याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, ते आणि न्यायमूर्ती पार्डीवाला कोरममध्ये आदेश देतील. न्यायमूर्ती नरसिंहा म्हणतात की, त्यांनी सेतू समुद्रम प्रकल्प प्रकरणात तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आहे, यामुळे ते या प्रकरणाची सुनावणी करू शकत नाहीत.
न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामींना सांगितले की, ते या प्रकरणाशी संबंधित अतिरिक्त पुरावे मंत्रालयात देऊ शकतात. यावर स्वामी म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही मंत्रालयाला अनेक पत्रे पाठवली आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी राम सेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याची मान्यता देण्यासाठी याचिका दाखल केल्याची माहिती आहे. राम सेतू हा लाखो हिंदूंच्या श्रद्धेशी निगडीत असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.
स्वामी म्हणतात की, न्यायालयाने केंद्र सरकारला 1 डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते, परंतु केंद्राने कोणतेही शपथपत्र दाखल केले नाही. यानंतर न्यायालयाने कॅबिनेट सचिवांना समन्स बजावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की, प्रतिज्ञापत्र तयार केले जात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होईल.
रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यासंदर्भातील याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. (हेही वाचा: Ganga Vilas Cruise: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला 'गंगा विलास' क्रूझला ग्रीन सिग्नल; काय आहे या क्रूझचे भाडे? जाणून घ्या)
दरम्यान, राम सेतु किंवा अॅडम्स ब्रिज ही एक कॉझवे आहे, जी तामिळनाडूमधील पंबन बेट श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडते. पुलाची एकूण लांबी अंदाजे 50 कि.मी. आहे. अॅडम ब्रिज, मन्नारची आखात पाल्क सामुद्रधुनीपासून विभक्त करते. या संरचनेच्या सभोवतालचा समुद्र तीन फूट ते 30 फूट खोल उंच आहे. समुद्रशास्त्राच्या संशोधनात असे सूचित केले गेले आहे की हा पूल 7,000 वर्ष जुना आहे.