Pushkar Singh Dhami: पुष्कर सिंह धामी यांच्या गळ्यात उत्तराखंड मुख्यमंत्री पदाची माळ, तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा
Pushkar Singh Dhami | (Photo Credit : Facebook)

उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात घडलेल्या घटनात्मक पेचानंतर आता मुख्यमंत्री पदावरुन तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat ) यांना बाजूला व्हावे लागत आहे. तीरथ सिंह रावत यांच्यानंतर आता उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री (Chief Minister of Uttarakhand) पदाची सूत्रे पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याकडे सोपवली जाणार आहेत. पुष्कर सिंह धामी हे कुमाऊ जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून ते दोन वेळा निवडूण आले आहेत. पुष्कर सिंह धामी हे आरएसएस आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. धामी हे उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओएसडी राहिले आहेत. माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनीच पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचे स्वागत केले. तीरथ सिंह रावत यांना घटनात्मक पेच निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री पद सोडावे लागले.

उत्तराखंड भाजपाच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री निवडीवर चर्चा झाली. सीएम तीरथ सिंह रावत (Uttarakhand CM Tirath Singh Rawat) यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी (2 जुलै) राजीनामा दिला. त्यानंतर डेहराडून येथील भाजप पक्ष कार्यालयात आमदारांच्या गटाची एक बैठक झाली. यात नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या निवडीवर एकमत झाले. (हेही वाचा, Uttarakhand CM: उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? BJP ची आज महत्वपूर्ण बैठक)

दरम्यान, उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी सतपाल महाराज, धनखड सिंह, माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि भगतसिंह कोश्यारी यांचीही नावे चर्चेत होती. अखेर सर्व नावांना पूर्णविराम देत पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजपने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि भाजप महासचिव डी पुरंदेश्वरी यांना निरीक्षक म्हणून उत्तराखंड राज्यात पाठवले होते. त्यांच्यासोबत उत्तराखंड प्रभारी दुष्यंत गौतम आणि सह प्रभारी रेखा वर्मा यांची बैठक झाली.

तीरथ सिंह रावत हे उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदी चार महिने राहिले. तीरथ सिंह रावत यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजप अध्य७ जे पी नड्या (JP Nadda) यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर रात्री उशीरा त्यांनी राज्यपालांकडे जाऊन आपला राजीनामा अधिकृतरित्या सोपवला. घटनात्मक पेच नर्माण झाल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 70 जागांच्या विधानसभेमध्ये भाजपचे 57 आमदार आहेत.