Pulwama Terror Attack:पाकिस्तान मधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना दिल्लीत तातडीचे बोलावणे
पाकिस्तान मधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना दिल्लीत तातडीचे बोलावणे (Photo Credits-Twitter)

Pulwama Terror Attack: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. त्यातच आता पाकिस्तान (Pakistan) मधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया (Ajay Bisaria) यांना तातडीने दिल्लीत (Delhi) बोलावले आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती देण्यात आली असून दिल्लीमधील राजकीय वर्तुळात या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यामुळे धडा शिकवला जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच बिसारिया यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांना दिल्लीत बोलावले असल्याचे सांगितले जात आहे. तर भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तान उच्चायुक्त सोहेल महमूद यांना समन्स पाठवले आहेत. या समन्समध्ये पाकिस्तानने लवकरच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. (हेही वाचा-Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा; पाकिस्तानी माध्यमांनी व्यक्त केला अभिमान)

गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अन्य मंडळींनी बैठकीसाठी आज उपस्थिती लावली होती. या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून भारताने आता पाकिस्तानला (Pakistan) प्रतिउत्तर देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयात भारताने (India) पाकिस्तानकडून 'मोस्ट फेवर्ड नेशन'(Most favoured nation) चा दर्जा काढून घेतला आहे.