काश्मीरच्या पुलवामामध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. देशात संतापाची लाट पसरली असून, पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र नेहमीप्रमाणेच पाकिस्तानने याबाबत आपले हात झटकले आहेत. एकीकडे जगातील विविध राष्ट्रे पाकिस्तानच्या या कृत्याबाबत निषेध व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या तमाम वर्तमानपत्रांनी या दहशतवादी हल्ल्यावर बातम्या आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये दहशवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक संबोधून पाकिस्तान केलेल्या कृत्याचा अभिमान बाळगत आहे.
पाकिस्तानचे आघाडीचे वर्तमानपत्र 'द नेशन'ने दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिकांची पदवी दिली आहे. 'भारतव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा हल्ला, 44 भारतीय जवान मृत्युमुखी, अनेक जखमी', अशी हेडलाईन दिली आहे. पाकिस्तानच्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी मुख्य म्हणून छापली गेली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळून स्फोट घडवून आणला, यात 44 जवान जागीच ठार झाले. तरी पाकिस्तानी माध्यमांनी या पाकिस्तानचा हात नसल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा : दहशतवाद्यांनी केलेल्या चुकीला चोख उत्तर मिळेल; पीएम मोदी यांचा इशारा)
पाकिस्तान आॅब्झर्व्हरने, 'भारतव्याप्त काश्मीर मधील स्फोटात 44 भारतीय जवान ठार, अनेक जखमी', अशी हेडलाईन छापली आहे. द डॉनने, 'काश्मीरमध्ये झालेल्या स्फोटात 44 भारतीय जवान ठार'. द ट्रिब्यूनने, 'पुलवामा हल्ल्यात 44 जवान ठार' अशा हेडलाईन दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सरकारने पाकिस्तानला चांगलेच प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे. भारताने पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आहे. दरम्यान कराची आर्ट काॅन्सिलकडून जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कराची साहित्य महोत्सवाचे आमंत्रण आले होते, मात्र आता या घटनेमुळे त्यांनी आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.