जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे हल्ला (Pulwama Terrorist Attack) केला. या हल्ल्यात भारताचे तब्बल 44 जवान शाहिद झाले आहेत. देशभरात याबाबत संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जवळजवळ 55 मिनिटे चाललेल्या हा बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत चर्चा घडली. त्यानंतर पंतप्रधानांनी आपले मत व्यक्त केले. या बैठकीत नरेंद्र मोदींसह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
'या हल्ल्यानंतर देशातील जनतेचे रक्त उसळत आहे. देशात आक्रोश आहे ते मी समजू शकतो. आमच्या सुरक्षा बऴांना पू्र्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. आम्हाला आमच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे. दहशतवाद्याने खूप मोठी चूक केली आहे आणि त्यांना याचे उत्तर मिळेल', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचसोबत ज्या वाटेने तुम्ही चालला आहात तो उद्ध्वस्त करणारा रस्ता असून याचे सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. (हेही वाचा : भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेतला)
पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या उद्देशाने व्यापार आणि उद्योगात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नॅशनचा दर्जा काढून घेतला आहे.दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे.