लोकसभा निवडणूक 2019 संपली तरी पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील संघर्ष मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि पर्यायाने ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप (BJP) आमदार आणि कार्यकर्ते असा हा निवडणुकीपूर्वीपासून सुरु झालेला संघर्ष कायम आहे. आज या संघर्षाने उच्च टोक गाठले. भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी सरकार विरोधात रॅली काढली. या रॅलीला सरकारने परवानगी दिली नव्हती तरीही भाजप कार्यकर्त्यांनी ही रॅली काढल्याचे समजते. दरम्यान, या रॅलीला हिंसक वळण लागले. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुर आणि पाण्याचा मारा केला. पोलिसांनी या वेळी महिला कार्यकर्त्यांना तब्यात घेतल्याचेही वृत्त आहे.
कोलकाता शहरात भाजपने शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी माहिती देताना सांगितले की, ममता बॅनर्जी या डाव्या पक्षांप्रमाणे हिंसा आणि दहशत निर्माण करुन सत्ता राबवू आणि ताब्यात ठेऊ पाहत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्ष हा पश्चिम बंगालमध्ये शांततामय मार्गानेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकेन. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. त्या विरोधात उमटणारा आवाज ममता बॅनर्जी दडपू पाहात आहे. (हेही वाचा, प. बंगाल हिंसाचार: कार्यकर्त्यांचे मृतदेह पक्षकार्यालयात घेऊन जाताना अडवले; भाजप कडून 'बंद'ची हाक, राज्यात काळा दिवस पाळणार)
दरम्यान, ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणूक आणि त्या आधीपासून रडीचा डाव खेळत आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील जनता ही ममता बॅनर्जी सरकार विरोधात उभी राहात आहे. नेमके हेच ममता बॅनर्जी यांना सहन होत नाही. त्यामुळेच त्या अशा प्रकारे जनतेचा आवाज दडपू पाहात आहेत. परंतू, भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जी यांच्या दडपशाही विरोधात आवाज उठवत राहिल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी प्रसारसमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.