प. बंगाल हिंसाचार: कार्यकर्त्यांचे मृतदेह पक्षकार्यालयात घेऊन जाताना अडवले; भाजप कडून 'बंद'ची हाक, राज्यात काळा दिवस पाळणार
BJP To Observe 'Black Day' Tomorrow; Calls For 12-Hour Statewide 'Bandh'. (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Election) भाजप (BJP) आणि टीएमसी (TMC) यांच्यामध्ये उसळलेल्या हिंसाचाराने आता गंभीर वळण घेतले आहे. शनिवारी भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली होती, त्यानंतर रविवारी त्यांच्या अंत्यसंस्कारावरून नवा वाद उफाळला. बशीरहाट (Basirhat) येथे अंत्यसंस्कारासाठी पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह राज्य पोलिसांनी मध्येच अडवले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्याची तयारी सुरु केली. या पार्श्वभूमीवर भाजपने 12 तासांचा बंद (12-hour bandh) पुकारला आहे. आज (दि.10) संपूर्ण राज्यात भाजप काळा दिवस पाळणार आहे.

भाजपाचे नेता राहुल सिन्हा (Rahul Sinha) यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांनी पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगना येथे शनिवारी सायंकाळी उशीरा या दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. ज्यात आठजण मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या 5 कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हिंसाचारात 18 जण बेपत्ता असल्याचा दावा भाजपने केला आहे.

(हेही वाचा: "ममता बॅनर्जी या तर हिरण्यकश्यपू राक्षसाच्या कुळाच्या वंशज": साक्षी महाराज)

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मृतदेह अडवले होते. या गोष्टीमुळे चिडलेल्या भाजपने आज राज्यात बंद पुकारून काळा दिवस पाळण्याचे ठरवले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.