Punjab National Bank (Photo Credits: PTI | Representational Image)

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB) पुन्हा एकदा कर्ज घोटाळ्यामुळे अडचणीत आली आहे. बँकने दीवान हाउसिंग फायनान्स लि. (DHFL) ला देण्यात आलेल्या 3,688.58 कोटी कर्जाला ‘घोटाळा’ (Fraud) म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी पीएनबीमध्ये 14 हजार कोटींपेक्षा जास्त रकेमेचा घोटाळा केला आहे. पीएनबीने गुरुवारी सांगितले की, त्यांनी दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट) खात्यातील 3,688.58 कोटी रुपयांच्या फसवणूकीची माहिती आरबीआयला दिली आहे.

अनेक खोट्या कंपन्यांमार्फत 97,000 कोटी रुपयांच्या एकूण बँक कर्जापैकी, 31,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे एका अहवालानुसार नामुंद केले होते, त्यानंतर डीएचएफएल चर्चेत आले. आता वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार पीएनबीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'कंपनीच्या (डीएचएफएल) खात्यात 3,688.58 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा अहवाल आरबीआयला सोपवण्यात आला आहे.’ त्यात नमूद केले आहे की, बँकेने यापूर्वीच विहित नियमांनुसार 1,246.58 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गेल्या वर्षी कंपनीत नियमांचे उल्लंघन केल्याच्या वृत्तानंतर एसएफआयओसह (सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस) विविध एजन्सींनी तपास सुरू केला. हीच तीच कंपनी आहे जिची येस बँके (Yes Bank) तील कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी चालू आहे. कंपनीचे प्रवर्तक वाधवान बंधूंना अटक करण्यात आली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांची संपत्ती गुरुवारी कुर्क केली आहे.

(हेही वाचा: Yes Bank Crisis: येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, ED ने राणा कपूर व वाधवान बंधूंची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त)

काल मिळालेल्या बातमीनुसार, येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने माजी बँक प्रमुख राणा कपूर (Rana Kapoor) आणि डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांची 2,203 कोटी रुपयांची मालमत्ता अॅटॅच केली आहे.