PM Modi| Photo Credits: Twitter/DD News

आतापर्यंत आपण अनेक मंत्री, खासदार, आमदार यांच्या संपत्तीचे डोळे पांढरे करणारे आकडे ऐकले आहेत. मात्र सर्वांनाच उत्सुकता आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे नक्की किती संपत्ती आहे. आता याबाबत माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती असून यातील बहुतांश रक्कम बँकांमध्ये जमा आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, कारण त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या जमिनीचा भाग दान केला केला.

पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मोदींची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही, त्यांच्या नावावर कोणती गाडी नाही, परंतु त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत व त्यांची किंमत 1.73 लाख रुपये आहे. मोदींच्या जंगम मालमत्तेत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांची वाढ झाली आहे, परंतु त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. पीएमओच्या वेबसाइटनुसार, 31 मार्च 2022 पर्यंत, मोदींकडे एकूण 2,23,82,504 रुपयांची मालमत्ता आहे.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2002 मध्ये त्यांनी एक निवासी जमीन खरेदी केली होती. ही जमीन इतर तीन लोकांच्या संयुक्त मालकीची होती, या सर्वांचा त्या जमिनीत समान हिस्सा होता. ताज्या माहितीनुसार, रिअल इस्टेट सर्व्हे नंबर 401/a वर तीन इतरांसह मोदींची संयुक्त भागीदारी होती आणि या प्रत्येकाचा त्या जमिनीमध्ये 25 टक्के हिस्सा होता. परंतु आता हे 25 टक्के मोदींच्या मालकीचे नाहीत कारण, त्यांनी ते दान केले आहेत.

31 मार्च 2022 पर्यंत पंतप्रधानांकडे एकूण 35,250 रुपये रोख रक्कम आणि 9,05,105 रुपये किमतीची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि 1,89,305 रुपये किमतीची जीवन विमा पॉलिसी पोस्ट ऑफिसमध्ये आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर सहकार्‍यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. सिंह यांच्याकडे 31 मार्च 2022 पर्यंत 2.54 कोटी रुपये आणि 2.97 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. (हेही वाचा: Mukesh Ambani यांनी सलग दुसर्‍या वर्षी Reliance Industries मधून वेतन न घेणं केलं पसंत!)

यासह, धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, आरके सिंग, हरदीप सिंग पुरी, पुरुषोत्तम रुपाला, जी रेड्डी अशा मोदी मंत्रिमंडळातील सर्व 29 सदस्यांनी स्वतःची आणि त्यांच्या अवलंबितांची संपत्ती जाहीर केली आहे. माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही गेल्या आर्थिक वर्षातील संपत्ती जाहीर केली आहे. जुलैमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.