PM Modi's 71st Birthday: 17 सप्टेंबर रोजी पीएम नरेंद्र मोदी साजरा करणार 71 वा वाढदिवस; BJP कडून जय्यत तयारी सुरु, जाणून घ्या काय असतील कार्यक्रम
PM Modi| Photo Credits: Twitter/DD News

17 सप्टेंबर रोजी पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 71 वा जन्मदिवस आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने विशेष तयारी केली जात आहे. या वाढदिवसानिमित्ताने 17 सप्टेंबर ते पुढील तीन आठवडे म्हणजे 7 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे, ज्या अंतर्गत 14 कोटी रेशन पिशव्यांचे वाटप, 5 कोटी ‘धन्यवाद मोदीजी’ पोस्टकार्ड देशभरातील बूथवर पाठवले जाणे, नद्या स्वच्छ करण्यासाठी 71 ठिकाणांची ओळख आणि सोशल मीडियावर हाय-प्रोफाइल मोहिमा तसेच कोविड लसीकरण आणि पंतप्रधानांचे आतापर्यंतचे काम आणि त्यांचे आयुष्य यावर चर्चासत्र, अशा गोष्टींचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लसीकरणाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी लसीकरणाला गती देण्याचे आवाहन केले आहे. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना जेपी नड्डा म्हणाले की, 17 सप्टेंबर रोजी भाजपचे प्रत्येक बूथ लेव्हल कार्यकर्ते लोकांना लस देण्यात मदत करतील.

पीएम मोदींना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा लिलाव pmmemontos.gov.in या वेबसाइटद्वारे केला जातो. हा लिलाव पुन्हा एकदा 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान होईल. लवकरच लोकांना याबाबत माहिती दिली जाईल. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट पाहता भाजपने लसीकरणासाठी स्वयंसेवकांची मोठी फौज उभी केली आहे. पक्षाने केवळ 43 दिवसात 6 लाख 88 हजार स्वयंसेवक उभे करून एक विक्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे नेते म्हणतात की, हा कदाचित जगातील सर्वात मोठा स्वयंसेवक कार्यक्रम आहे.

या स्वयंसेवकांच्या मदतीने भाजप 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवून नवीन विक्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. पक्षाचे म्हणणे आहे की, पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त, पक्षाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक दोघेही जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी घेऊन येणे आणि त्यांना सोयीस्करपणे लस  देण्यासाठी एकत्र येतील.

यातून मिळालेली रक्कम नमामि गंगे कार्यक्रमात वापरली जाते. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, डी पुरंदेश्वरी, विनोद सोनकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राजकुमार चहर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस आणि सेवा सप्ताह कार्यक्रमासंदर्भात विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. या नेत्यांची जबाबदारी पद्धतशीरपणे योजना आखणे, अंमलबजावणी करणे आणि आढावा घेणे आहे.