Petrol Prices: पेट्रोलच्या जास्त किंमतीबाबत भारत जगात 42 व्या स्थानावर; देशात अमेरिका, चीन, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेपेक्षाही महाग Petrol
Photo Credit - PTI

भारतातील महागाई दर महिन्याला वाढत आहे. देशात रोजच्या जीवनातील वस्तूंसोबत पेट्रोलचे दरही (Petrol Prices) आकाशात भिडत आहेत. दररोज केंद्र सरकारवर पेट्रोलच्या किंमतीबाबत टीका होत आहे. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, फक्त भारतातच पेट्रोल सर्वात महाग नाही, तर असे अनेक देश आहेत जिथे पेट्रोलचे दर भारतापेक्षा कैक पटीने जास्त आहेत. पेट्रोलच्या किंमतीबाबत भारताचा जगात 42 वा क्रमांक लागतो. म्हणजेच जगातील 41 देशांमध्ये भारतापेक्षा महागडे पेट्रोल विकले जात आहे. या देशांमध्ये ब्रिटन, जर्मनी, हाँगकाँग, इटली, नेदरलँडसह अनेक देशांचा समावेश आहे.

सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात देशात पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होत होती, त्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ देशात पेट्रोलचे दर स्थिर आहेत. भारतात इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि राज्यांमध्ये कर कमी करण्यावरून वाद सुरू झाला आहे. इंधनाच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कच्च्या तेलाच्या (पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठीचा कच्चा माल) जागतिक किमतीत झालेली वाढ होय.

आता बँक ऑफ बडोदा इकॉनॉमिक रिसर्चच्या अहवालात 9 मे 2022 पर्यंत विविध देशांमधील पेट्रोलच्या किमतींचा अंदाज लावला. यात जगभरातील 106 देशांचा समावेश आहे. डेटानुसार, भारतात पेट्रोलची किंमत $1.35 प्रति लीटर आहे, ज्याद्वारे तो जगात 42 व्या क्रमांकावर आहे. ज्या देशांमध्ये पेट्रोलचे दर भारतापेक्षा जास्त आहेत त्यामध्ये यूके, हाँगकाँग, फिनलंड, जर्मनी, इटली, नेदरलँड, ग्रीस, फ्रान्स, पोर्तुगाल आणि नॉर्वे आहेत. याठिकाणी पेट्रोल प्रतिलिटर 2 डॉलरच्या वर आहे.

हाँगकाँगमध्ये पेट्रोल सर्वात जास्त महाग म्हणजे प्रति लिटर 2.58 डॉलर आहे. जर्मनीमध्ये 2.29 डॉलर प्रति लिटर, इटलीमध्ये 2.28 डॉलर प्रति लिटर, फ्रान्समध्ये 2.07 डॉलर प्रति लिटर, इस्रायलमध्ये 1.96 डॉलर प्रति लिटर, ब्रिटनमध्ये 1.87 डॉलर प्रति लिटर आहे. सिंगापूरमध्ये ते 1.87 डॉलर प्रति लिटर, न्यूझीलंडमध्ये 1.75 डॉलर प्रति लिटर आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1.36 डॉलर प्रति लीटर विकले जात आहे. या बड्या देशांशिवाय फिनलँड, पोर्तुगाल, नॉर्वे असे अनेक देश या यादीत आहेत, जिथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 2 डॉलरच्या आसपास आहे.

अहवालानुसार, भारत आणि तुर्कस्तानमध्ये पेट्रोलच्या किमती सध्या सारख्याच आहेत. जपानमध्ये पेट्रोल 1.25 डॉलर प्रति लिटर, चीनमध्ये 1.21 डॉलर प्रति लिटर, यूएसमध्ये 98 सेंट्स प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय भारताच्या शेजारी देशांबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशमध्ये 1.05 डॉलर प्रति लीटर, पाकिस्तानमध्ये 77 सेंट्स आणि श्रीलंकेत 67 सेंट्स प्रति लिटर दराने पेट्रोल उपलब्ध केले जात आहे. अहवालानुसार, व्हिएतनाम, केनिया, युक्रेन, नेपाळ आणि व्हेनेझुएलामध्ये भारतापेक्षा कमी किंमतीमध्ये पेट्रोल विकले जात आहे. (हेही वाचा: एलआयसी समभाग पदार्पणातच कोसळला, पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांची निराशा, पाहा कितीवर लिस्ट झाला LIC Share)

दरम्यान, व्हेनेझुएला येथे जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल ($0.03) विकले जात आहे. त्यानंतर लिबिया ($0.03) आणि इराण ($0.05) यांचा समावेश आहे. टॉप टेन स्वस्त पेट्रोल असणाऱ्या देशांमध्ये चार देश आशिया आणि आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिकेतील प्रत्येकी एक देश आहे.