बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालूका एका भयानक घटनेमुळे हादरुन गेला आहे. येथील ढाकेफळ येथील गावात अज्ञात आरोपींन एका कुटुंबाला (Family) पेट्रोल (Petrol) टाकून घरासह जाळण्याचा (Attempt to Burn) प्रयत्न केला आहे. भाजी व्यवसायीक गोविंद थोरात आणि त्यांच्या कुटुंबीयासोबत हा प्रकार घडला. थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरुन युसूफ वडगाव पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. थोरात यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. घडलेल्या घटनेत थोरात हे गंभीर भाजले आहेत. त्यांना केज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीच चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत.
अंगावर पेट्रोल टाकून शरीरासह घराला आग
अज्ञात आरोपींनी थोरात यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांच्या शरीराला आणि घराला आग लावली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पेट्रोल हा ज्लनशील पदार्थ असल्याने पुढच्या काहीच क्षणात आगीने पेट घेतला. या वेळी थोरात यांची पत्नी आणि मुले घरात होती. जी आगीमध्ये अडकली. दरम्यान, घडला प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने उपाययोजना करत आटोक्यात आणली आणि त्यावर नियंत्रणही मिळवले. परिणामी गंभीर धोका टळला. मात्र, यात थोरात हे गंभीर भाजले गेले. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
झोपलेल्या कुटुंबीयांना आगीच्या ज्वाळांनी मध्यरात्री घेरले
अधिक माहिती अशी की, थोरात यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पत्नी आणि मुलांसह ते केज तालुक्यातील ढाकेफळ गावातील हनुमान मंदिर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. सोमवारी त्यांनी दिवसभर व्यवसाय केला. त्यानंतर नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते घरी परतले आणि रात्रीचे भोजन करुन कुटुंबीयांसोबत झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री अचानक त्यांना आगीच्या ज्वाळांनी चटके बसत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे घरातील सर्वच जण जागे झाले. इतक्यात आगीचा भडका उडाला. ज्यामुळे थोरात आणि कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरु केला. तो ऐकून शेजारीही जागे झाले. नागरिकांनी एकत्र येत तातडीने आग नियंत्रणात आणली. घराचे पत्रे काढून कुटुंबीयांना सुखरुपपणे बाहेर काढले.
शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ
शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थोरात आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचले. संसाराची मात्र राख रांगोळी झाली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये आरोपींनी घराला आग लावण्यासाठी पेट्रोलचा वापर केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. घडल्या प्रकारामुळे थोरात कुटुंबाला धक्का बसला असून ते घाबरुन गेले आहे. गावामध्येही कमालीचा तणाव असून घबराटीचे वातावरण पाहायला मिळत आहे.