![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/Liquor-Shops-380x214.jpg)
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे दुकानदाराने दारू देण्यास नकार दिल्याने एका मद्यपीने वाईन शॉपला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (12 नोव्हेंबर) दिवाळीच्या मुहूर्तावर ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. गुन्हा करण्याच्या एक दिवस आधी दुकानदाराने आरोपीला दारू नाकारल्याने संतापलेल्या या व्यक्तीने वाईन शॉप पेटवून दिल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधू असे आरोपीचे नाव आहे. तो शनिवारी (11 नोव्हेंबर) मधुरवाडा येथील वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी आला होता. मात्र, दुकान बंद करण्याची वेळ असल्याने त्या व्यक्तीला दारू देण्यास दुकानदाराने नकार दिला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने दुकानदाराशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र तरीही दुकानदाराने त्याला दारू दिली नाही. अखेर आपण याचा सूड उगवू असा इशारा देत मधु तिथून निघून गेला.
त्यानंतर आरोपीने रविवारी सायंकाळी पेट्रोल भरलेली टाकी घेऊन ते दुकान गाठले आणि दुकानावर पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली. तसेच त्यावेळी वाईन शॉपवर उपस्थित कर्मचाऱ्यांवरही पेट्रोल ओतले. त्यानंतर त्याने दुकानाला आग लावली. सुदैवाने, आरोपीने दुकान पेटवण्यापूर्वीच आतील लोक दुकानातून बाहेर पडले होते, नाहीतर तेही दुकानासह जिवंत जळाले असते. (हेही वाचा: Hyderabad Fire: हैदराबाद इमारतीच्या आगीत 9 जणांचा मृत्यू, कार दुरुस्त करताना ठिणगीमुळे घडली दुर्घटना)
वाईन शॉपला आग लावल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपीने दुकानाला आग लावल्याने वाईन शॉपचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. आगीत दुकानातील संगणक, प्रिंटर आणि इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि 436 नुसार गुन्हा दाखल केला आहे.