कौतुकास्पद! एकेकाळी Coronavirus ची सर्वाधिक प्रकरणे असलेल्या केरळमध्ये आज नवीन एकही रुग्ण आढळला नाही; राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या फक्त 95 वर
केरळ आरोग्यमंत्री केके शैलजा (Photo Credit : ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लढाईबाबत केरळने  (Kerala) देशासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. कोरोना व्हायरस प्रकरणात देशात केरळ आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यांत पहिल्यांदा रुग्ण आढळून आले होते. मात्र केरळने अतिशय कमी वेळात महाराष्ट्रापेक्षा आपली परिस्थिती उत्तम सुधारली आहे. 2 मे पर्यंत केरळमध्ये 498 प्रकरणांची नोंद झाली असून, त्यापैकी 392 म्हणजेच 78 टक्के लोक ठीक झाले आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज कोरोना व्हायरसचे एकही प्रकरण आढळले नाही. यासह राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 95 आहे. आतापर्यंत एकूण 401 रुग्ण बरे झाले आहेत.

देशातील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (CM Pinarayi Vijayan)  यांनी काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. त्यानुसार रविवारी वाहन चालवण्यासह सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक मेळावे, चित्रपटगृह, धार्मिक स्थळे, कार्यक्रम, मॉल, दारूची दुकाने, बार, सलून, ब्युटी पार्लर, जिम आणि शैक्षणिक संस्था राज्यभर उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही.

ग्रीन झोनमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7.30 या दरम्यान आठवड्यातून सहा दिवस दुकाने खी राहू शकतील. गेल्या 21 दिवसांत कोरोना विषाणूची एकही घटना समोर न आल्याने एर्नाकुलम जिल्हा केरळमधील ग्रीन झोनमध्ये सामील झाला आहे. हा एकमेव जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. कन्नूर आणि कोट्टायम जिल्हे रेड झोन अंतर्गत आहेत व राज्यातील इतर सर्व जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. (हेही वाचा: Coronavirus: 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना तसेच गरोदर महिलांना घराबाहेर पडता येणार नाही - अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी)

केरळमध्ये 31 जानेवारी रोजी कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता.  केरळमध्ये 92 दिवसांत संक्रमित रुग्णांची संख्या केवळ 495 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 10 मार्चला पहिले प्रकरण समोर आले होते. आता तेथे 12,296 हून अधिक रुग्ण आहेत. 54 दिवसातच राज्यात 12000 हून अधिक प्रकरणे आढळली आहेत.