भारतामध्ये अजूनही स्त्री-पुरुष समानता हे ‘फक्त’ शाळेल शिकवले जाणारे मूल्य आहे. अजूनही स्त्रियांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही झगडावे लागत आहे. त्यात स्त्रियांवरील अत्याचाराबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. देशातील बहुतांश महिला पुरुषांच्या तुलनेत महिलांवरील हिंसाचार न्याय्य मानतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NHFS-5) च्या दुसऱ्या टप्प्यात 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. यापैकी 14 राज्यांतील 30 टक्के महिलांनी पुरुषांकडून होणाऱ्या मारहाणीचे समर्थन केले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांसोबतचे गैरवर्तन न्याय्य आहे असे मानणाऱ्या पुरुषांची टक्केवारी महिलांपेक्षा कमी आहे. NHFS-5 डेटानुसार, तेलंगणा (84 टक्के), आंध्र प्रदेश (84 टक्के) आणि कर्नाटक (77 टक्के) या तीन राज्यांतील 75 टक्क्यांहून अधिक महिलांनी पतीची पत्नीला मारहाण करणे हे योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मणिपूर (66 टक्के), केरळ (52 टक्के), जम्मू आणि काश्मीर (49 टक्के), महाराष्ट्र (44 टक्के) आणि पश्चिम बंगाल (42 टक्के) ही इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे मोठ्या संख्येने महिलांनी पतीचे पत्नीच्या मारहाणीचे समर्थन केले.
हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वेक्षणात महिलांनी सासरच्या लोकांचा अपमान करणे हे त्यांच्या मारहाणीचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले. हिमाचलमध्ये केवळ 14.8 टक्के महिलांनी पतीकडून मारहाणीचे समर्थन केले. महिलांनी पतीने मारहाण करण्याची कारणेही सांगितली. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे, सासरच्यांचा आदर न करणे, वाद घालणे, नातेसंबंधास नकार देणे, न सांगता घराबाहेर पडणे, घर व मुलांची काळजी न घेणे, चांगले जेवण तयार न करणे इत्यादींचा समावेश होता. (हेही वाचा: नाद केला अंगाशी आला; फॉरेनची बायको मिळविण्याच्या नादात 5.78 लाख रुपयांना चुना, विवाहोत्सुक तरुणाला फटका)
घर आणि मुले सांभाळत नाहीत म्हणून आणि सासरच्या मंडळींचा अपमान केल्यामुळे नवऱ्याकडून मार खाणे योग्य असल्याचे महिलांनी सांगितले. कोरोना विषाणू दरम्यान लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. काही पुरुष साथीच्या आजारामुळे कमाई नसणे आणि इतर कारणांमुळे निराश झाले आहेत व त्याचा राग ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर काढताना दिसत आहेत.