देशात नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून (New Parliament Inauguration) राजकीय गदारोळ सुरू आहे. येत्या 28 मे रोजी होणाऱ्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर अनेक राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यामध्ये आता राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि समाजवादी पार्टी (SP) यांचीही नावे जोडली गेली आहेत. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी बुधवारी सामुहिक बहिष्कार टाकला. सध्याच्या सरकारच्या काळात संसदेतून लोकशाहीचा आत्मा काढून टाकण्यात येत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपतींना निमंत्रित न करण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्याऐवजी त्यांना निमंत्रित न केल्याने पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींचा अपमान केला असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक राजकीय पक्ष या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. सरकारचा हा निर्णय थेट लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोपही त्यांनी संयुक्त निवेदनात केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन व्हावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.
विरोधी पक्षांचा असा युक्तिवाद आहे की, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गेला पाहिजे कारण राष्ट्रपती हे केवळ देशाचे प्रमुख नसून ते संसदेचे अविभाज्य घटक देखील आहेत. ते संसदेचे अधिवेशन बोलावतात, ते स्थगित करतात आणि संपवतात. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी 19 विरोधी पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 'दुर्भाग्यपूर्ण' असल्याचे म्हटले. त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे आवाहन केले.
जोशी म्हणाले, ‘मी विरोधी पक्षांना आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा आणि कार्यक्रमाला उपस्थित राहावे.’ ते पुढे म्हणाले, ‘लोकसभा अध्यक्ष हे संसदेचे पालक आहेत आणि त्यांनीच पंतप्रधानांना संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे.’ (हेही वाचा: अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि AAP नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट)
दरम्यान, नव्या संसदेच्या उद्घाटनाला काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पार्टी, शिवसेना (उद्धव ठाकरे), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके), राष्ट्रीय लोक दल, तृणमूल काँग्रेस, जेडीयू, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, आरजेडी, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP) आणि एमडीएमके या पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.