सार्वजनिक रस्त्यावरील सुरक्षिततेचा विचार केला तर दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका असतो. अशावेळी सुरक्षित राहण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम आणि प्रभावी शस्त्र म्हणजे ‘हेल्मेट; होय. आता, भारतीय रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 1998 चा मोटार वाहन कायदा अद्यतनित केला आहे. यासोबत दुचाकीस्वारांना हेल्मेट न घालणे किंवा ते नीट परिधान न करणे, यासाठी तात्काळ 2 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सरकारने हेल्मेट परिधान करण्याविषयीचे नियम कडक केले आहेत.
खालील परिस्थितीत 2,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो –
- दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले असेल पण त्याचे बकल लावले नसेल तर त्याला MVA च्या कलम 194D अंतर्गत 1,000 रुपये दंड आकारला जाईल.
- हेल्मेटला मूळ BSI (भारतीय मानक ब्यूरो) प्रमाणपत्र नसल्यास, तुम्हाला MVA च्या कलम 194D अंतर्गत 1,000 रुपये दंड होऊ शकतो.
- याशिवाय लाल सिग्नल तोडणे अशा इतर वाहतूक उल्लंघनांमध्येही तुम्ही हेल्मेट घातले असले तरीही 2,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
BIS शिवाय असलेले हेल्मेट तुमच्या डोक्याचे रक्षण करू शकत नाहीत. अनेकदा अपघातादरम्यान ते तुटतात. अशा परिस्थितीत, दंडासाठीच नव्हे तर स्वत:साठीही चांगले हेल्मेट वापरा. स्ट्रॅप लॉक असलेले हेल्मेट घालणे फार महत्वाचे आहे. आपल्या डोक्याचे जास्तीत जास्त रक्षण करण्यासाठी हेल्मेट डोक्याभोवती घट्ट बंधने आवश्यक आहे व त्यासाठी स्ट्रॅप लॉक आवश्यक आहे. (हेही वाचा: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ, 10 महिन्यांची थकबाकीही देणार सरकार)
दंड टाळण्यासाठी अनेक दुचाकी चालक डोक्यावर फक्त नावालाच हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे, म्हणूनच सरकारने नियमात बदल केले आहेत. सरकारने दोन वर्षांपूर्वी भारतीय मानक ब्युरो (BIS) प्रमाणित हेल्मेट अनिवार्य केले होते. या अंतर्गत, बीआयएस प्रमाणित नसलेल्या हेल्मेटची निर्मिती आणि विक्री देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच रस्ते सुरक्षा नियम अपडेट केले आहेत. नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तसेच, चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते.