केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी अत्यावश्यक औषधांची (National List of Medicines 2022) नवीन यादी जाहीर केली. नव्या यादीत 384 औषधांचा समावेश करण्यात आला असून, त्यात एक हजारांहून अधिक औषधांच्या क्षारांचा समावेश असेल. 2015 नंतर आता 2022 मध्ये नवीन यादी आली आहे. राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये जीवनरक्षक औषधांचा समावेश आहे. यामध्ये कर्करोगापासून ते मधुमेहासारख्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. त्याच वेळी, या यादीतून 26 औषधे काढून टाकण्यात आली आहेत, ज्यात रॅनिटिडाइन, सुक्रॅफेट, व्हाईट पेट्रोलटम, एटेनोलॉल, मिथाइलडोपा यांचा समावेश आहे.
अंतःस्रावी आणि गर्भनिरोधक औषधे जसे की फ्लूड्रोकॉर्टिसोन, ऑरमेलॉक्सिफेन, इन्सुलिन ग्लेर्गिन आणि टेनेलाइटिस देखील या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय मॉन्टेलुकास्ट (श्वसनाचे औषध) आणि लॅटनोप्रोस्ट (नेत्रोपचारासंबंधी औषध) यांचीही नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय कार्डियोव्हस्कुलर, डबिगट्रान आणि टेनेक्टेप्लेस देखील यादीत आहेत.
Union Health Minister Dr. Mansukh Mandaviya launched the National List of Essential Medicines today
This list of 384 medicines has been updated after 2015. It's a very long process... there were 140 consultations with over 350 experts, he said pic.twitter.com/3HIJNZKmat
— ANI (@ANI) September 13, 2022
राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेली औषधे बनवणारी कंपनी त्यांच्यावर अधिक नफा घेऊ शकत नाही किंवा त्यांच्या किंमती मनमानीपणे वाढवू शकत नाहीत. या औषधांची किंमत नॅशनल फार्मा अथॉरिटी ठरवेल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 2015 नंतर सुमारे 7 वर्षांनी ही यादी पुनरुज्जीवित करण्यात आली आहे. या यादीमध्ये बहुतेक क्रॉनिक आजारांच्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे औषध सतत किंवा दीर्घकाळ गरजेचे असते. (हेही वाचा: बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या 34 अनधिकृत संस्थांची आरबीआयकडून यादी जाहीर)
राष्ट्रीय अत्यावश्यक यादीत समाविष्ट असलेल्या औषधांच्या किमती नियंत्रित करून लाखो लोकांना फायदा होईल, असा सरकारचा प्रयत्न आहे. या नवीन यादीमुळे औषधे स्वस्त होतील, त्यामुळे लोकांचा आर्थिक बोजा कमी होईल. ही सूची तयार करणे एक मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापित केली जाते. यावेळी 350 तज्ञांची मते आणि 140 लोकांशी सल्लामसलत करून ही यादी बनवली.