IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

IndiGo Flight Bomb Threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी (IndiGo Flight Bomb Threat News) बुधवारी (19 जून) मिळाली. इंडिगोच्या 6E 5149 विमानासोबत हा प्रकार घडला. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून हे विमान 10:30 च्या सुमारास मुंबईत उतरविण्यात आले. विमान आणि विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. इंडिगोने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 5149 ला (Chennai-Mumbai IndiGo Flight) बॉम्बची धमकी मिळाली होती. मुंबईत उतरल्यावर, क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमान एका विलगीकरण विभागात नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवले आहे.

इंडिगोने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही विमनाचा कसून शोध घेत आहोत. तसेच, या विमानाव कामही करत आहोत. सुरक्षा एजन्सी, आणि सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. (हेही वाचा, Delhi-Varanasi IndiGo Flight Bomb Threat: टेक ऑफ आधी इंडिगो विमानात आढळली बॉम्ब ठेवल्याची चिठ्ठी; विमान थांबवून शोध मोहीम सुरू)

बॉम्बच्या धमक्यांमुळे वाढवली सुरक्षा

विमानतळ अधिकाऱ्यांना बॉम्बची धमकी असलेले ईमेल मंगळवारी प्राप्त झाले. त्यानंतर वडोदरा, गुजरात आणि पाटणा, बिहार येथील विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयाला बॉम्बची धमकी देणारा नुकताच ईमेल प्राप्त झाला. ज्यामध्ये हे ईमेल पाठवणाऱ्याने बीएमसी मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी इमारतीची झडती घेतली मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा:Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिसांना ताज हॉटेल, विमानतळ उडवून देण्याच्या धमकीचा फोन )

मुंबईतील रुग्णालयांनाही बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या

दरम्यान, या आधी मंगळवारीही (18 जून) मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले होते. जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलसह अनेक हॉस्पिटलच्या बेडखाली आणि बाथरूममध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा पाठवणाऱ्याने केला आहे.

पोलिकांकडून तपास सुरुच

बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटवरून व्हीपीएन नेटवर्क वापरून ईमेल पाठवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. धमक्या मिळाल्यानंतर, पोलिस पथके आणि बॉम्बशोधक पथकांनी रुग्णालयांची झडती घेतली परंतु, काहीही संशयास्पद आढळले नाही. अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बॉम्बच्या धमक्यांच्या मालिकेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सुरक्षितचेचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा उपायांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी धमक्या देणाऱ्यांच्या मूळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.