Representational Image (Photo Credits: File Image)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सागर (Sagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील छनबिला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सरकारी शाळेत नवजात बालकाचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. असा मृतदेह आढळून येताच एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अहवालानुसार एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने शाळेतच बाळाला जन्म दिला होता. पोलीस तपासात हे उघड झाले आहे.

पोलिसांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, मुलगी काहीच बोलत नाही. दुसरीकडे याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या काकाला ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी 16 वर्षाच्या 11वीच्या विद्यार्थिनीने शाळेत बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने त्याची तपासणी केली होती. त्या दिवशी मूल पूर्णपणे निरोगी होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला बाळाचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला. (हेही वाचा: Triple Murder in South Delhi: दक्षिण दिल्ली येथे तिहेरी हत्याकांड; आई, वडील आणि मुलीचा मृत्यू; नेब सराय येथील घटना)

माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही तपासासाठी शाळेत पोहोचले. येथे त्यांनी शाळेतील संपूर्ण कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यानंतर पोलिसांच्या पथकाने शाळेत लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला. या प्रकरणातील आश्चर्याची बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या आईने आपली मुलगी गरोदर असल्याची माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. आईच्या या वक्तव्यावर पोलिसांनाही संशय आहे. कारण, मुलगी अनेक दिवस शाळेत जात नव्हती.

काही दिवसांनी तिला प्रसूती होणार होती तेव्हा ती शाळेत जाऊ लागली. पोलिसांनी सध्या मुलीच्या काकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जे काही पुरावे समोर येतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.