Tablighi Jamaat members at Delhi's Nizamuddin Markaz (Photo Credits: IANS)

मार्च महिन्यात जेव्हा भारतामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव केला, तेव्हा दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ (Delhi Nizamuddin Markaz) धार्मिक कार्यक्रमात अनेक तबलीगी जमातचे (Tablighi Jamaat) लोक सामील झाले होते. या लोकांमुळे भारतातील कोरोना विषाणूचे प्रमाण प्रचंड वाढले. इतकेच नाही तर हे लोक देशात विविध ठिकाणी गेल्याने कोरोनाचे संक्रमणही झाले होते. आता तबलीगी जमात कार्यक्रमात सामील झाल्यामुळे, केंद्र सरकारने 2200 परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारतात येण्यास बंदी घातली आहे. हे लोक पर्यटक व्हिसावर भारतात येत होते आणि इथे धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत होते. आता हे नागरिक पुढील 10 वर्षे भारतात येऊ शकणार नाहीत.

एएनआय ट्वीट -

सूत्रांच्या माहितीनुसार हे नागरिक पर्यटक व्हिसावर भारतात आले होते आणि तबलीगी जमात कार्यक्रमात सहभागी झाले होते. या नागरिकांना व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 10 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ब्लॅकलिस्ट मध्ये ज्या 2200 विदेशी लोकांना टाकण्यात आले आहे त्यामध्ये, नायजेरिया, माली, म्यानमार, थायलंड, टांझानिया, केनिया, श्रीलंका, जिबूती, यूके, दक्षिण, आफ्रिका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि नेपाळमधील नागरिकांचा समावेश आहे.

या सर्वांवर आरोप आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी बेकायदेशीरपणे गर्दी जमविली, ज्यामुळे विषाणूचा झपाट्याने प्रसार झाला. त्यानंतर बर्‍याच राज्यांतील लोक यामुळे संक्रमित झाले. सुरुवातीच्या काळात, या संसर्गामुळे 17 राज्यातील सुमारे एक तृतीयांश लोक संक्रमित झाले. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या संदर्भात तबलीगी जमात वादात सापडली होती. तबलीगी जमात ही मुस्लिम धार्मिक संस्था आहे. भारताव्यतिरिक्त जगातील अनेक देशांचे मुस्लिम या संघटनेचे सदस्य आहेत व या संस्थेचे मुख्यालय दिल्लीत आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संक्रमणापासून स्वतःचे संरक्षण करण्याची अंतिम जबाबदारी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची स्वतःची- आरोग्य मंत्रालय)

मार्च महिन्यात दिल्लीत या सदस्यांचा एक धार्मिक कार्यक्रमही झाला होता जेव्हा लोक मरकझ येथे राहिले होते. दरम्यान, लॉक डाऊन जाहीर करण्यात आले व त्यानंतर लोक याठिकाणी अडकले. दरम्यान, गेल्या गुरुवारी दक्षिण दिल्लीतील साकेत कोर्टात 12 नवीन आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ज्यात 541 परदेशी नागरिकांवर आरोप ठेवले गेले. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 47 आरोपपत्र दाखल केले आहेत ज्यात 900 हून अधिक जमातीच्या लोकांना आरोपी ठरवण्यात आले आहे.