
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने “भारतात टेलिव्हिजन वाहिन्यांचे अपलिंकींग आणि डाऊनलिंकिंग, 2022” विषयी 09.11.2022 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार खाजगी वाहिन्यांना दररोज 30 मिनिटांसाठी सार्वजनिक सेवा प्रसारण करावे लागेल. खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्या प्रसारणकर्ते आणि त्यांच्या संघटनांसोबत मंत्रालयाने या संदर्भात अतिशय विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायांच्या आधारे 30-1-2023 रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
या सूचनेनुसार मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की प्रसारण करण्यात आलेल्या कार्यक्रमात समाविष्ट असलेला संबंधित आशय हा सार्वजनिक सेवा प्रसारण म्हणून समजण्यात येईल. तसेच हे देखील स्पष्ट करण्यात येत आहे की एकाच वेळी 30 मिनिटे कालावधीमध्ये या आशयाचे प्रसारण करण्याची गरज नाही त्याऐवजी तितक्या कालावधीची लहान लहान भागात विभागणी करून त्याचे प्रसारण करता येऊ शकेल आणि प्रसारकाने याबाबत प्रसारण सेवा पोर्टलवर मासिक अहवाल ऑनलाईन सादर करण्याची गरज आहे. प्रसारणाच्या विषयामध्ये राष्ट्रीय महत्त्वाचा आणि सामाजिक संदर्भाचा खालील विषयांसह आशय समाविष्ट असला पाहिजे. हे विषय आहेत..
- शिक्षण आणि साक्षरतेचा प्रसार;
- कृषी आणि ग्रामीण विकास;
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण;
- विज्ञान आणि तंत्रज्ञान;
- महिला कल्याण;
- समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण;
- पर्यावरण आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि
- राष्ट्रीय एकात्मता
खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्यांकडून ऐच्छिक अनुपालन आणि स्वयं प्रमाणनाच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा प्रसारण साध्य करण्याचा या मार्गदर्शक सूचनेचा उद्देश आहे.
या मार्गदर्शक सूचनेची प्रत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20on%20Obligation%20of%20PSB_1.pdf आणि या ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलवर उपलब्ध आहे.