
सरकार सध्या ऑनलाईन माध्यमातून नागरिकांशी व्यवहार करतात. पण जसे हे ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत तसेच स्कॅमर्स कडून नागरिकांची लूट होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. नव्या नव्या मार्गाने आता आर्थिक फसवणूक होत असल्याने सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. काहींची फसवणूक ही सरकारच्या नावे देखील होत आहे. हैदराबाद मध्ये असाच एक फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. 53 वर्षीय व्यक्तीने 1.9 लाख गमावले आहेत. पीएम किसान स्कीम च्या नावाखाली बनावट मेसेज पाठवला होता.
ओल्ड सफिलगुडा येथे राहणारा आणि एका खाजगी कंपनीत काम करणारी पीडित तरुणाला व्हॉट्सअॅप वर एक लिंक मिळाली होती. त्यामध्ये लिंक खरी वाटत असली तरीही ती बनावट असल्याचं समोर आल्याचं Deccan Chronicle चं वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, पीडीत तरूणाने त्या लिंक वर क्लिक केले. त्यानंतर त्याला एका अनोळख्या साईट वर रिडिरेक्ट करण्यात आले. त्याला हे पोर्टल खरं असल्याचं वाटलं. स्कीम बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याच्या इच्छेने त्यावर क्लिक केले. त्यामध्ये दिलेली सारी प्रोसेस फॉलो करत त्याने ओटीपी देखील दिला आणि पैसे गमावले. घोटाळा लक्षात येताच, पीडितेने तातडीने या घटनेची माहिती रचकोंडा सायबर क्राईम पोलिसांना दिली, ज्यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तुम्हाला सरकारी योजनांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असल्यास, लक्षात घ्या की सरकारने अधिकृत प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत जिथे नागरिक माहितीची पडताळणी करू शकतात आणि कायदेशीर गोष्टी जाणून घ्या. उदाहरणार्थ, अधिकृत पीएम किसान वेबसाइट – pmkisan.gov.in– आणि नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया– india.gov.in– हे सरकारी योजनांच्या माहितीसाठी विश्वसनीय स्रोत आहेत.