राष्ट्रपिता महात्मा गांधींची पणती Ashish Lata Ramgobin ला 7 वर्षांची शिक्षा; लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आहे आरोप
Ashish Lata Ramgobin (Photo Credits: Twitter)

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पणतीला (Great-Granddaughter) फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. 56 वर्षीय आशिष लता रामगोबिनवर (Ashish Lata Ramgobin) 60 लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन कोर्टाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. लता रामगोबिन प्रसिद्ध कार्यकर्ते इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची कन्या आहेत. लता यांच्यावर उद्योजक एसआर महाराजांची फसवणूकीचा आरोप आहे. डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने त्यांना शिक्षेवर अपील करण्यास परवानगी नाकारली आहे.

आशिष लता रामगोबिन यांनी एसआर महाराजांकडून भारतातील एका कंसाइन्मेंटसाठी अंदाजे 62 लाख रुपये आयात आणि सीमाशुल्क म्हणून घेतल्याचा आरोप आहे. आशिष लता रामगोबिन यांनी महाराजांना त्या कंसाइन्मेंटच्या नफ्यातील वाटा देण्याबाबतही भाष्य केले होते. 2015 पासून त्या या प्रकरणात जामिनावर होत्या. 2015 मध्ये लता रामगोबिनविरूद्ध खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा राष्ट्रीय अभियोग प्राधिकरणाचे (NPA) ब्रिगेडिअर हंगवानी मुलौदजी म्हणाले होते की, लता यांनी संभाव्य गुंतवणूकदारांना बनावट पावत्या व कागदपत्रे दिली होती. यासह, त्यांनी आश्वासन दिले की, तागाचे तीन कंटेनर भारतातून पाठवले जात आहेत.

त्यावेळी लता रामगोबिन यांना 50,000 रँडच्या जामिनावर सोडण्यात आले. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाला माहिती देण्यात आली की, लता रामगोबिन यांनी ऑगस्ट 2015 मध्ये न्यू अफ्रीका अलायन्स फुटवेअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक महाराज यांची भेट घेतली होती. कंपनी कापड, ताग आणि पादत्राणे यांचे उत्पादन, आयात आणि विक्री करते. लाभांशाच्या आधारे महाराजांची कंपनी इतर कंपन्यांना आर्थिक मदतही करते.

एनपीएच्या प्रवक्त्या नताशा कारा यांनी कोर्टाच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, लता यांनी महाराजांना सांगितले होते की, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना भारतातील एका कंसाइन्मेंटसाठी आयात आणि सीमाशुल्क भरण्यात अडचणी येत आहेत आणि त्यांना बंदरावर सामान क्लियर करण्यासाठी पैशांची गरज आहे. लता रामगोबिन यांची कौटुंबिक प्रमाणपत्रे व नेटकेअरच्या कागदपत्रांमुळे महाराजांनी त्यांच्यासोबत कर्जासाठी लेखी करार केला होता आणि त्यांना 62 लाख दिले होते. लता यांनी महाराजांना नेटकेअर चालान व डिलिव्हरी नोटच्या मदतीने माल उतरून पेमेंट झाल्याची माहितीही दिली होती. (हेही वाचा: Child Pornography In Kerala: केरळ पोलिसांनी चाइल्ड पोर्न प्रकरणात 28 जणांना केली अटक; 370 गुन्हे दाखल)

मात्र जेव्हा ही कागदपत्रे बनावट असल्याचे महाराजांना समजले तेव्हा त्यांनी या प्रकरणात लता यांच्यावर केस केली. तसेच त्यावेळी कोणताही माल भारतामधून आला नव्हता. आता या प्रकरणात लता यांना 7 वर्षांची शिक्षा झाली आहे.