मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (Paytm Payments Bank Ltd) या नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्याने एक भयानक पाऊल उचलले. नोकरी जाण्याच्या भीतीने त्याने स्वतःचे जीवन संपवले आहे. अलीकडेच पेटीएम कंपनी बंद होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. अशा परिस्थितीत कंपनी बंद पडण्याच्या भीतीने या व्यक्तीने आत्महत्या केली. काँग्रेस नेते जितू पटवारी यांनी या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. गौरव गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून, तो पेटीएम कंपनीत फील्ड मॅनेजर म्हणून कार्यरत होता.
लासुदिया पोलीस ठाण्याचे प्रभारी तारेश सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गौरव गुप्ता हा मूळचा ग्वाल्हेरचा रहिवासी होता. येथील स्कीम क्रमांक 78 मध्ये राहत असताना तो पेटीएम कंपनीत फील्ड मॅनेजर म्हणून काम करत होता. सोनी यांच्या म्हणण्यानुसार गुप्ता नोकरीच्या तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला पेटीएममधून नोकरी जाण्याच्या भीती होती असे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. याच कारणातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या पोलीस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गौरवची पत्नी मोहिनीने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपासून त्याला नोकरीचा ताण होता. त्याला नोकरी जाण्याची भीती होती. याच कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. माहितीनुसार, गौरवचे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दोन मुली असून एक 7 वर्षांची आणि दुसरी 2 वर्षांची आहे. ग्वाल्हेरमध्ये त्याचे वृद्ध आई-वडील आणि मोठा भाऊ आहे. (हेही वाचा: Delhi Shocker: हृदयविकाराच्या धक्क्याने पतीचे 25 व्या वर्षी निधन, दु:ख सहन न झाल्याने पत्नीचाही मृत्यू)
दरम्यान, 31 जानेवारी रोजी आदेश जारी करताना, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवेवर बंदी घातली होती. 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड डिव्हाइसेस, वॉलेट्स, FASTags, एनसीएमसी कार्ड्स इत्यादींमध्ये व्याज, कॅशबॅक किंवा रिफंड व्यतिरिक्त कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉपअपला परवानगी दिली जाणार नाही, असेही आरबीआयने कळवले आहे. बँकेने पुढे सांगितले की, ग्राहकांना बचत बँक खाती, चालू खाती, प्रीपेड साधने, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादींसह त्यांच्या खात्यातून शिल्लक रक्कम काढण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिली जाईल.