पंजाबमधील औद्योगिक शहरांपैकी एक असलेल्या लुधियानामधून (Ludhiana) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका मुलावर आईच्या हत्येचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, लुधियाना येथील न्यू अशोक नगरमध्ये 26 वर्षीय तरुणाने आईला छतावरून खाली फेकून दिले. या घटनेमध्ये आईचा मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेने आजूबाजूचे लोकही हैराण झाले आहेत. आईने जेवणासाठी केलेली भाजी न आवडल्याने मुलाने आईची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चरणजीत कौर (65) यांनी सोमवारी लौकीची भाजी केली होती, जी तिचा लहान मुलगा सुरिंदर सिंग याला आवडत नव्हती. आरोपी सुरिंदर सिंगने आईला दुसरी भाजी बनवण्यास सांगितले, मात्र चरणजीत कौर यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या मुलाने आपल्या वृद्ध आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरात असलेले वडील आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी मधे आले असता, मुलाने त्यांनाही मारहाण केली. यामध्ये सुरिंदरचे वडील गुरनाम सिंग हेही जखमी झाले.
त्यानंतर आरोपीने आईला पहिल्या मजल्यावरून ढकलून दिले. या घटनेत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. आरोपी सुरिंदरच्या नातेवाइकांनी सांगितले की, तो खूप रागीट स्वभावाचा आहे. सोमवारी दुपारची ही घटना असल्याचे आरोपीच्या चुलत भावाने सांगितले. मृत्यूनंतर सालेम तबरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: स्मार्टफोन विकत घेण्यासाठी चक्क स्वतःचे रक्त विकायला निघाली मुलगी; पोहोचली रुग्णालयात, जाणून घ्या काय घडले पुढे)
आरोपी मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही. त्याच्या मोठ्या भावाचेही मानसिक संतुलन बिघडले आहे. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की, दोन्ही भावांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. आरोपी कधी-कधी रस्त्यावर विटा आणि दगड मारू लागतात, त्यामुळे शेजाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.