
गुजरातमध्ये (Gujarat) 'लव्ह मॅरेज' (Love Marriages) करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता कदाचित राज्यातील लोकांना त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागेल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार घटनात्मकदृष्ट्या शक्य असल्यास, प्रेमविवाहांमध्ये पालकांच्या संमती अनिवार्य करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करेल. पाटीदार समाजातील काही घटकांनी प्रेमविवाहात पालकांची संमती अनिवार्य करावी, अशी मागणी केल्यानंतर भूपेंद्र पटेल यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
रविवारी (30 जुलै) मेहसाणा येथे पाटीदार समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सरदार पटेल ग्रुपच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, राज्याचे आरोग्य मंत्री रुषिकेश पटेल यांनी लग्नासाठी पळून जाणाऱ्या मुलींची प्रकरणांचा अभ्यास करण्यास सांगितले होते, जेणेकरून प्रेमविवाहासाठी पालकांची संमती अनिवार्य करणार्या प्रणालीवर विचार करता येईल. घटनेने यासाठी पाठिंबा दिल्यास अभ्यास करून उत्तम निकाल देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
याआधी 2021 मध्ये गुजरात सरकारने गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्यात सुधारणा केली होती. यामध्ये लग्नाच्या माध्यमातून फसवणूक करून धर्मांतर करणे हा दंडनीय गुन्हा ठरविण्यात आला. यामध्ये 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. मात्र, उच्च न्यायालयाने या कायद्यातील काही कलमांना स्थगिती दिली, ज्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे. (हेही वाचा: 'आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो', Govt's Caste Based Survey विरोधातील याचिका फेटाळल्यावर लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया)
दरम्यान, भारतात पुरुष 21 व्या वर्षी आणि स्त्रिया 18 व्या वर्षी लग्न करू शकतात. प्रेमविवाहाच्या बाबतीत, जोडपे सर्व अधिकृत निकष पूर्ण करत असल्यास त्यांना पालकांच्या संमतीची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही.