Lok Sabha Elections 2019 Results: उद्या सकाळी 8 वा मतमोजणीला सुरुवात; अवघ्या काही तासांत होणार तमाम उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय
पीएम मोदी आणि राहुल गांधी (File Photo)

अखेर इतके दिवस केलेला अट्टाहास, प्रचार, भाषणे, जनतेला दिलेली आश्वासने, आरोप प्रत्यारोप, कुरघोड्या यांचे फलित उद्या मिळणार आहे. देशाचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांवर परिणाम करणारा निर्णय उद्या होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा (Lok Sabha Elections 2019 Results) हा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असता, उमेदवारांची काय अवस्था चालली असेल याचे कल्पनाच केलेली बरी. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिल्यांना ईव्हीएम (EVM) मशीनची मतमोजणी होणार असून, नंतर प्रत्येक केंद्रावरील 5 व्हीव्हीपॅट  (VVPAT) ची मोजणी होणार आहे.

ही मतमोजणी पूर्णपणे शांततेत व कोणत्याही अनुचित प्रकाराविना पार पाडण्यासाठी देशात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. देशात विविध ठिकाणी सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त अशी तिहेरी सुरक्षा मतमोजणी केंद्रांना दिली गेली आहे. महत्वाचे राजकारणी, उमेदवार यांच्या निवासस्थानांवर पोलिसांचा बंदोबस्त केला गेला आहे. निकालानंतर विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

निवडणुकांच्या निकालावरून देशात हिंसाचार उफाळू  नये म्हणून केंद्र सरकारने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यावर बिहारमध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लहिलं असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ते 18 तास लागणार असल्याने, लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र किंवा त्याही पेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. राज्यात पालघर आणि भिवंडीमध्ये मतमोजणीच्या सर्वाधिक 35 फेऱ्या होणार आहेत. तर सर्वात कमी 17 फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील. राज्यभरात 48 लोकसभा मतदारसंघांत 97 हजार 640 मतदान केंद्रांवर मतदान झाले असून, यावेळी 867 उमेदवार रिंगणात आहेत. (हेही वाचा: विरोधी पक्षनेत्यांना धक्का; निकालाच्या काही तास आधी निवडणूक आयोगाने फेटाळली 'ही' मोठी मागणी)

दरम्यान, उद्या निवडणुका आयोगाची वेबसाईट, विविध वाहिन्या रिझल्टचे प्रक्षेपण करतील. मात्र प्रत्येकालाच टीव्हीसमोर बसून राहणे अथवा वेबसाईट चेक करत राहणे शक्य नाही. यासाठी पोल वॉचडॉग (Poll Watchdog) ने 'व्होटर हेल्पलाइन' (Voter Helpline) नावाचे एक अॅप सादर केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही मतमोजणी संदर्भातील प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.