लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून रिझल्ट बाहेर पडायला सुरुवात होईल. मागच्या वेळी व्हीव्हीपॅट (VVPAT) बाबतीत झालेला घोटाळा लक्षात घेता यावेळीही व्हीव्हीपॅटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणून, विरोधकांनी मतमोजणीआधी व्हीहीपॅट मशिनमधील पावत्या मोजाव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाला (Election Commission) केली होती. पण आयोगाने ही मागणी फेटाळली आहे. आधी ईव्हिएम (EVM) मशीनची मतमोजणी केली जाईल आणि नंतर व्हीहीपॅट च्या मतपावत्यांची मोजणी करून त्याचे आकडे ईव्हिएम च्या आकड्यांशी पडताळले जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Election Commission rejects demands of opposition parties' regarding VVPAT. More details awaited pic.twitter.com/zyxETDjWOE
— ANI (@ANI) May 22, 2019
व्हीव्हीपॅटच्या मोजणीमुळे निकाल हाती यायला वेळ लागू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आज निवडणूक आयोगाची एक महत्वाची बैठक पार पडली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. आधी व्हीव्हीपॅटची मोजणी सुरु केली तर निवडणुकीचे निकाल हाती येण्यास वेळ लागू शकतो असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे ठरले. लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा क्षेत्रांतले आकडे एकत्र करून मग लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा: लोकसभा निवडणूकीचे निकाल लागण्यापूर्वीच मतांमध्ये फेरफार? खासगी वाहने आणि दुकानांमध्ये ईव्हीएम सापडल्याने वाद (Video))
देशातील 22 प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेत व्हीव्हीपॅटची मोजणी आधी करावी अशी मागणी केली होती. त्यावर आज दिल्ली येथे बैठक पार पडली. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी प्रदर्शने करीत विरोध दर्शवला गेला. घोषणाबाजी करत अनेक ठिकाणी आयोगाविरोधात पोस्टर्स लावले गेले.