karnataka: मंदिरातील प्रसाद खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू, 70 जण रुग्णालयात दाखल
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

बेंगळुरू ग्रामीण हद्दीतील होस्कोटे (Hoskote) येथे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याच्या संशयास्पद प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर 70 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, लोकांना अन्नातून विषबाधा होण्याचे कारण हे परिसरातील मंदिरामधील प्रसाद असल्याचा संशय त्यांना  आहे. रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी काहींना डिस्चार्ज देण्यात आला असून, काहींवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सध्या तरी या लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने नेमके कारण आताच समजू शकत नाही, असेही पोलीस म्हणाले. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, शनिवारी यापैकी बहुतेक जण होस्कोटे शहरातील एका मंदिरात गेले होते, जेथे त्यांनी प्रसाद खाल्ला. पुढे एक दिवसानंतर, त्यापैकी काहींना अतिसार आणि उलट्या झाल्याची तक्रार समोर आली आणि त्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी दुपारी यातील एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज सकाळी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे माहिती आहे की सुमारे 70 लोकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने पाच रुग्णालये ओळखली आहेत, ज्यात जास्तीत जास्त रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती पाहता, एका रुग्णालयामध्ये संपूर्ण मजला आयसीयूमध्ये उपचारांसाठी समर्पित केला आहे. (हेही वाचा: Gadchiroli: सरकारी आश्रमशाळेतील 105 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; 73 मुलींची प्रकृती गंभीर, उपचार सुरु)

रुग्णांना शंका आहे की त्यांनी शनिवारी मंदिरात खाल्लेल्या प्रसादामुळे कथित विषबाधा झाली, मात्र यामध्ये काही लोक असेही होते ज्यांनी प्रसाद खाल्ला नाही आणि तरीही त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी रुग्णांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत कोणतीही तक्रार नोंदवली नाही. त्यांचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे, तसेच ते आरोग्य विभाग आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीची वाट पाहत आहेत. निवेदने आणि तक्रारींच्या आधारे, लवकरच गुन्हा नोंदवून आवश्यक कारवाई केली जाईल.